सरकारची दूरसंचार वाहन क्षेत्राला मदत ; शेअर बाजार निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर
Government, telecommunication, Stock market,

मुंबई – केंद्र सरकारने वाहन क्षेत्राला उत्पादन आधारित अनुदान योजना जाहीर केले आहे. त्याचबरोबर कर्जाच्या गाळात अडकलेल्या दूरसंचार क्षेत्राला काही सवलती जाहीर केल्या आहेत. या कारणामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही बुधवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. त्यामुळे निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले आहेत.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 476 अंकांनी वाढून 58,723 त्या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 139 अंकांनी म्हणजे 0.80 टक्क्यांनी वाढून 17,519 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला.
दूरसंचार क्षेत्राला दिलेल्या सवलतींमुळे एअरटेल कंपनीचा शेअर मोठ्या प्रमाणात वाढला. टायटन, एनटीपीसी, एचसीएल टेक, स्टेट बॅंक, पावर ग्रिड, टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात बऱ्याच प्रमाणात वाढ नोंदली गेली. मात्र आशा खरेदीच्या वातावरणातही एशियन पेंट्स, ऍक्सिस बॅंक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने दूरसंचार कंपन्यांना सरकारचे देणे देण्यासाठी चार वर्षाची मुदत दिली आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे हे आजारी असलेले क्षेत्र पुनरुज्जीवित होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने वाहन कंपन्यांना उत्पादन आधारित अनुदानाची योजना जाहीर केली आहे.
यामुळे आगामी काळात या दोन क्षेत्राकडे गुंतवणूकदार लक्ष देण्याची शक्यता वाढली आहे. जागतिक बाजारातून आज नकारात्मक संदेश आले असले तरी गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष करून बरीच खरेदी केली.परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भारतात गुंतवणूक सुरू असून काल या गुंतवणूकदारांनी 1,639 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
अमेरिकेमध्ये व्याजदरवाढ लवकरच होणार नसल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतामध्ये गुंतवणूक करीत असल्याचे वातावरण आहे. शेअर बाजाराचे निर्देशांक कमालीच्या उच्च पातळीवर गेल्यामुळे आगामी काळामध्ये गुंतवणूकदार सावध राहून निवडक खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.




