पुणे – नारळाच्या घटलेल्या उत्पादनाचा मोठा परिणाम गोटा खोबर्याच्या दरावर झाला आहे. घाऊक बाजारात किलोच्या दरात आठवडाभरात तब्बल १०० रुपयांनी वाढ झाली आहे. पुढील आठवड्यात श्रावण महिना सुरू होत आहे. सणासुदीच्या या महिन्यात खोबर्याला मागणी वाढणार असल्याने दरात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी अशोक लोढा यांनी व्यक्त केला. मार्केट यार्डातील भुसार बाजारात खोबर्याचा एक किलोचा दर ३०० ते ३२० रुपये आहे. किरकोळ बाजारात किलोचा हाच दर ४२० रुपये आहे. येणार्या काळात रक्षाबंधन, पोळा, नागपंचमी, गणपती, गौराई, नवरात्र, दसरा-दिवाळी आदी सण आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून खोबर्याला मोठी मागणी असणार आहे. त्यामुळे बाजारात खोबर्याची आवक वाढली नाही तर दरात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. मुख्यता तामिळनाडू आणि कर्नाटकातून बाजारात खोबर्याची आवक होते. या दोन्ही राज्यांत मागील तीन वर्षांपासून नारळाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यंदा नारळाचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटले आहे. परिणामी खोबर्याची आवकही घटली आहे. सद्य:स्थितीत मागणीच्या तुलनेत खूप कमी आवक होत आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. पुण्यात रोज २० ते ३० टन खोबर्याची मागणी असते. मात्र, रोज १५ ते २० टन खोबर्याची आवक होत आहे. त्यामुळे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात खोबर्याला मागणी वाढते. विशेषत: गणेशोत्सवात बर्फी, पेढे, मोदक, फराळाच्या पदार्थांत खोबर्याचा वापर केला जातो. त्यामुळे खोबर्याला विशेष मागणी असते. तसेच, या काळात नारळालाही मागणी वाढते. खोबऱ्याला आतापर्यंतचा उच्चांकी भाव मिळाला आहे. येत्या काळात भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.’ – अशोल लोढा, व्यापारी, मार्केट यार्ड