लातूरचे वैभव..! गोपीनाथ मुंडेंचा 900 किलोचा भव्य पुतळा, विलासरावांच्या शेजारी दोस्तीचा सन्मान; काय आहेत वैशिष्ट्ये

Gopinath munde statue latur : लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून, त्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 11 ऑगस्ट रोजी संपन्न झाले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि मान्यवर उपस्थित होते.
दोस्तीचा अनोखा सन्मान
या पुतळ्याची खास बाब म्हणजे, तो लातूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी उभारण्यात आला आहे. गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांची मैत्री ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आगळी-वेगळी गाथा आहे. दोन दिग्गज नेत्यांचे पुतळे एकाच ठिकाणी उभे राहिल्याने, त्यांच्या मैत्रीला एक अनोखी मानवंदना मिळाली आहे. हा योगायोग लातूरकरांना विशेष समाधान देणारा आहे.
अनावरण सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा आणि त्यांच्या लोकनेते म्हणून असलेल्या योगदानाचा गौरव केला. सोहळ्यात मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा प्रभाव उपस्थितांनी स्मरला. या कार्यक्रमाने लातूरमधील नागरिकांमध्ये उत्साह आणि अभिमानाची भावना निर्माण केली.
हा पुतळा उभारण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. यासाठी निधीची तरतूद करून, भव्य भूमिपूजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. मात्र, अनावरणाचा मुहूर्त ठरत नसल्याने पुतळा दीड वर्षे झाकून ठेवण्यात आला होता. अखेर, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होऊन हा पुतळा लातूरच्या वैभवात भर घालणारा ठरला आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी अठरापगड जातींसाठी केलेलं कार्य आणि त्यांचा लोकनेते म्हणून असलेला लौकिक यामुळे हा पुतळा केवळ शिल्प नसून, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि सामाजिक समरसतेचा प्रतीक आहे. लातूरच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात हा पुतळा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
पुतळ्याची वैशिष्ट्ये काय?
- स्थान : लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी.
- उंची : 3.65 मीटर (12 फूट).
- वजन : 900 किलो.
- साहित्य : उच्च दर्जाचा ब्राँझ धातू.
- शिल्पकार : मुंबईतील नामवंत शिल्पकार विजय बोंदर.
- खर्च : पुतळा आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटी 51 लाख रुपये.
- क्षेत्रफळ : 3451.56 चौ.मी. जागेत पुतळा उभारण्यात आला आहे.





