सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दसरा मेळाव्यात (३० सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा अत्यंत अपमानास्पद आणि जहरी टीका केली. “मला मंगळसूत्र चोर म्हणतात, जयंत पाटील सांग तुझ्या कितव्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलंय?” असे म्हणत पडळकरांनी विरोधकांना शायरीतून उत्तर देताना राजकीय मैदान तापवले. दरम्यान, आता पाडळकरांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिंकांत शिंदे यांनी पडळकरांच्या भाषणावरुन तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, गोपीचंद पडळकर ही टीका करत असताना आपल्या मागे कोणीतरी आहे, हे त्यांना माहिती आहे म्हणूनच अशी वक्तव्य ते करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज देऊन देखील जाणीवपूर्वक टीका केली जात आहे, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, भाजपने सुसंस्कृतपणा असल्याचे दाखवू नये, सरकारमधील सर्व यंत्रणा आपल्याच बापाच्या असल्याचे समजून अशा प्रकारच्या टीका होत आहेत. हे सर्व ठरवून, प्लॅन करून केलं जात आहे. जयंत पाटील हे मोठे नेते आहेत ते दबत नाहीत, त्यामुळे त्यांना डॅमेज करण्यासाठी हे सर्व सुरू आहे, असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी पडळकरांच्या भाषणावरुन तीव्र संताप व्यक्त केला. ज्या सरकारकडून दबावाचे राजकारण सुरू आहे, त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्रातील जनता याचा विचार करेल. शिस्त पाळणाऱ्या पक्षातच आता शिस्त पाळली जात नाही. मग त्यांचे कान RSS च्या प्रमुखांनी टोचावे, असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.