Gopichand Padalkar on Suraj Chavan | अहिल्यादेवीसारखं काम देशात कुणाचं नाही. अहिल्यादेवीच्या पुण्यतिथीचे काम जगभरात सुरू आहे. अहिल्यादेवीना अभिवादन कुणी केलं नसेल असं करणार म्हणून मे महिन्यात पुण्यात 50 अहिल्या ढोल एकाच वेळी वाजवून अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले जाणार आहे. याबाबतची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच या कार्यक्रमासाठीच्या निमंत्रितांबद्दलही त्यांनी सांगितली. दरम्यान, या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या कार्यक्रमासाठी बोलवणार का? असा प्रश्न पडळकर यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी अजितदादा यांना बोलावणार नाही, असं थेट उत्तर दिले आहे. त्यांच्या या थेट उत्तरामुळे राजकीय वतुर्ळात चर्चांना उधान आले आहे. या सर्व घडामोडीवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर हा शेखचिल्ली माणूस : सुरज चव्हाण सुरज चव्हाण यांनी एक्सवर पोस्ट करत गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, गोपीचंद पडळकर हा शेखचिल्ली माणूस आहे. जसा शेखचिल्ली फांदी कापताना तुटायचा बाजूने बसून स्वतःच झाडावरून पडला होता. तसा हा शेखचिल्ली महायुतीतल्या नेत्यांवर बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय. या शेखचिल्लीला माहित पवारांना विरोध केला तरचं राजकीय जिवंत राहू शकतो. पवारांशिवाय या शेखचिल्लीची मार्केट किंमत झिरो आहे, असा हल्लाबोल सुरज चव्हाण यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केला आहे. आता सुरज चव्हाण यांच्या टीकेवर गोपीचंद पडळकर काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले होते पुण्यातील रेसकोर्स मैदानावर आमचा कार्यक्रम घेण्याचा विचार आहे. धनगरी ढोल आमचा आत्मा आहे. जगभरात असा रेकॉर्ड झाला नाही. ढोल वाजवणे शक्तीचा आणि भक्तीचा नाद पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पूर्ण वर्षभर होणार आहे. पुणे, मराठवाडा, खांन्देश या भागातून मोठ्या प्रमाणावर तरुण या कार्यक्रमाला सहभागी होणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, चंद्रकांतदादा पाटील, तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आणि इतर मान्यवरांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात येणार आहे, असं पडळकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, अजित पवारांना निमंत्रण देण्यात येणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, यावर त्यांनी स्पष्टपणे “नाही” असं उत्तर दिल आहे. याबाबत कारण विचारले असता पडळकर म्हणाले की, हा कार्यक्रम सरकारचा नसून धनगर समाजाचा आहे. धनगर समाजानेच हा कार्यक्रम ठरवला असून आम्ही कोणतीही शासकीय मदत घेतलेली नाही. हा एक रचनात्मक कार्यक्रम आहे. यात राजकारण आणण्याचे कारण नाही. ही किरकोळ बाब आहे, त्यामुळे कृपया राजकीय प्रश्न विचारू नयेत, असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.