Gopichand 33rd Film Update: गोपिचंदच्या ३३व्या चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एंट्री; ‘सत्यवती’च्या दमदार भूमिकेत झळकणार
Gopichand 33rd Film Update ऋतु वर्मा आज तिचा ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिचा खास फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सरप्राइज दिले. या पोस्टरमध्ये ऋतु एका आदिवासी मुलीच्या रूपात दिसत आहे.

Gopichand 33rd Film Update: दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गोपिचंद लवकरच आपल्या ३३व्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून निर्मात्यांनी नुकताच एक नवा अपडेट चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या चित्रपटात अभिनेत्री ऋतु वर्मा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ऋतु वर्माच्या वाढदिवसानिमित्त तिचा फर्स्ट लुक पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
ऋतु वर्मा आज तिचा ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिचा खास फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सरप्राइज दिले. या पोस्टरमध्ये ऋतु एका आदिवासी मुलीच्या रूपात दिसत आहे. तिच्या हातात धनुष्य असून ती लक्ष्यावर अचूक निशाणा साधताना दिसते. पोस्टरमधील तिचा लूक खूपच दमदार आणि प्रभावी वाटत आहे.
निर्मात्यांनी पोस्टर शेअर करताना ‘अचूक निशाणा, दमदार उपस्थिती’ अस कॅप्शन दिल आहे. त्याचबरोबर ऋतु वर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. या चित्रपटात ऋतु ‘सत्यवती’ नावाच्या आदिवासी तरुणीची भूमिका साकारणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. या भूमिकेत तिचा स्वभाव धाडसी आणि ताकदवान दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
View this post on Instagram
गोपिचंदचा हा ३३वा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये तयार होत आहे. हा एक ऐतिहासिक अॅक्शन ड्रामा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक संकल्प रेड्डी करत आहेत. या चित्रपटाची कथा सातव्या शतकातील एका कमी परिचित ऐतिहासिक घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.
या चित्रपटात गोपिचंद एका शूर योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या अॅक्शन सीनसाठी चाहत्यांमध्ये आधीपासूनच उत्सुकता पाहायला मिळत आहे. गोपिचंद त्यांच्या दमदार अॅक्शन भूमिकांसाठी ओळखले जातात आणि त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत.
या चित्रपटाची निर्मिती श्रीनिवासा सिल्वर स्क्रीन या बॅनरखाली केली जात आहे. चित्रपटाचे पहिले शेड्यूल काश्मीरमध्ये पूर्ण झाले असून सध्या पुढील शूटिंगची तयारी सुरू आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, दमदार अॅक्शन आणि मजबूत पात्रांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार असल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू आहे.
दरम्यान, ऋतु वर्माच्या या नव्या लूकला सोशल मीडियावर चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. गोपिचंद आणि ऋतु वर्मा यांची जोडी या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्यानेही चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
आता या ऐतिहासिक अॅक्शन ड्रामा चित्रपटातून गोपिचंद आणि ऋतु वर्मा प्रेक्षकांना किती प्रभावी अनुभव देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





