चक्क गूगल सेवा एवढ्या मिनिटे बंद : जग थांबले?

नवी दिल्ली – एक क्षणही इंटरनेटशिवाय आपण जगू शकत नाही अशी परिस्थिती सर्वत्र आहे. मात्र आज गूगलच्या सेवा काही काळ बंद होत्या. त्यामुळे संपूर्ण जग थांबले होते की काय, अशी परिस्थिती होती. कारण जगात साधारणतः जीमेलचे 180 कोटींपेक्षा अधिक यूजर्स असून यूट्यूबचेही 200 कोटींपेक्षा जास्त यूजर्स आहेत.
जगभरात गूगलच्या अनेक सेवा आज सायंकाळच्या सुमारास तब्बल 40 मिनिटांपर्यंत बंद पडल्या होत्या. लॉगइन आणि ऍक्सेसमध्येही अडचणी येत होत्या.
भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज सायंकाळी 5 वाजून 26 मिनिटे ते 6 वाजून 6 मिनिटांपर्यंत जवळपास 40 मिनिटांच्या कालावधीपर्यंत सर्व सेवा ठप्प होत्या.
या कालावधीत गूगल सर्च इंजिन आणि मॅप या सेवा सुरू होत्या, तर जीमेल, यूट्यूब, साइट्स, ड्राइव, क्लाउड सर्च, शीट्स, ग्रुप्स, हॅंगआउट्स, चॅट, वॉल्ट, करन्ट्स, फॉर्म्स, टास्क, वॉइस इत्यादी सेवा या कालावधित बंद होत्या.
या सेवा का बंद पडल्या होत्या, याबाबत काहीही कारण समजले नसून गूगलनेही अद्याप काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही.





