खुशखबर ! मुंबई-पुणे प्रवास होणार स्वस्त; तिकीट दरात ‘इतक्या’ रुपयांची कपात

मुंबई – मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळाच्या ‘शिवनेरी’ बसने मुंबई-पुणे दरम्यान इलेक्ट्रिक एसटी बस म्हणजेच ‘ई-शिवनेरी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे तिकाटाचे दरही कमी असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना दिलासा मिळणार आहे. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून ई-शिवनेरी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
परिचालन खर्च कमी असल्याने त्याचा लाभ प्रवाशांना मिळण्यासाठी मुंबई-पुणे शिवनेरीचे तिकीट दर 70 ते 100 रुपयांनी कमी केले जाणार असल्याचे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या मुंबई-पुणे प्रवासाचे तिकीट 515 रुपये आहे. ते अंदाजे 445 रुपये ते 415 रुपये इतके होऊ शकते. या ई-बसचे नामकरण ई-शिवनेरी करण्यात आले आहे. यामुळे ‘शिवनेरी’चा ग्राहक या नव्या गाडीकडेही आकृष्ट होण्याचा महामंडळाला विश्वास आहे. याशिवाय इलेक्ट्रिक बसमुळे पर्यावरणालाही हानी पोहचणार नाही.
बसची सुविधा
या बसमध्ये एकूण 43 प्रवासी बसू शकतात. यात संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा असणार आहे. याशिवाय आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी मोबाइल चार्जिंग आणि प्रकाश दिवे देखील उपलब्ध असणार आहेत. बॅग ठेवण्यासाठी बसच्या बाजूला वेगळी व्यवस्था असेल. या बसची बॅटरी संपूर्ण चार्ज केल्यावर 300 किलोमीटरचा टप्पा पार करू शकते.




