एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : आता दर महिन्याच्या 7 तारखेला मिळणार पगार, 3 महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. आता प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नियमित होणार असून, 44 टक्के थकित पगाराची रक्कम देण्यासाठी राज्य सरकार तातडीने 120 कोटी रुपये एसटी महामंडळाला हस्तांतरित करणार आहे. सरनाईक यांनी वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
काय आहेत तीन महत्त्वाचे निर्णय?
नियमित पगाराची हमी: पुढील महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारा निधी एक महिना आधीच एसटी महामंडळाला मिळेल. यामुळे दरमहा 7 तारखेला पगाराची खात्री होईल.
120 कोटींचा तातडीचा निधी: एसटी महामंडळाने मागणी केलेल्या 1076 कोटींपैकी 120 कोटी रुपये तात्काळ दिले जाणार आहेत.
उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने: थकित रकमेचा उर्वरित हिस्सा तीन टप्प्यांत महामंडळाला हस्तांतरित होईल.
दरम्यान, परिवहनमंत्री सरनाईक यांनी या निर्णयांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले. “या निर्णयांमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल आणि महामंडळाची सेवा अधिक सक्षम होईल,” असे सरनाईक यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
कर्मचाऱ्यांमध्ये आनंद –
या घोषणेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नियमित पगार आणि थकित रकमेच्या वितरणामुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.





