ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी गुडन्यूज! शासनाकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर; वेतनाचा मार्ग मोकळा
ST Employee : एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणपणे दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.

ST Employee : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सप्टेंबर २०२६ मधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी एसटी महामंडळाला ३९१.०२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
यासंदर्भातील शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आला. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन मिळावे, यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.
एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणपणे दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने सणापूर्वी वेतन मिळावे, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने निधी मंजूर केल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिवाळीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये आणि त्यांना कुटुंबीयांसोबत सण साजरा करता यावा, यासाठी शासन आणि एसटी प्रशासनाकडून समन्वयाने प्रयत्न केले जात आहेत. निधी मंजूर झाल्यामुळे वेतन वितरणासाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
“एसटी ही केवळ परिवहन सेवा नसून महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ही सेवा अहोरात्र सुरू ठेवणारे अधिकारी आणि कर्मचारी हे महामंडळाचे खरे बळ आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे, यासाठी आम्ही दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता एसटी प्रशासनाने वेतन वितरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.” असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.





