पुणे – शहरात मागील चोवीस तासांत 3 हजार 871 नवीन करोना बाधित रुग्ण आढळले असून, तब्बल 6 हजार 159 जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. लॉकडाऊननंतर रुग्णसंख्या काही प्रमाणात नियंत्रित होताना दिसत असून, गंभीर रुग्णांची संख्या मात्र अजूनही जास्तच आहे.
शहरात आतापर्यंत 4 लाख 6 हजार 526 जणांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी 3 लाख 54 हजार 840 रुग्ण बरेही झाले आहेत. तर 6 हजार 611 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 45 हजार 75 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
मागील दहा दिवसांत ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सुमारे दहा हजाराने कमी झाली आहे. यापैकी 1 हजार 368 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर 6 हजार 714 रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे. दरम्यान मागील चोवीस तासांत 16 हजार 650 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.
मृतांच्या संख्येत होतेय वाढ
बाधितांची संख्या कमी होत असून, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. असे असूनही मृतांची संख्या मात्र अजिबात कमी होताना दिसत नाही. रोज किमान 70 पेक्षा जास्त बाधितांचा मृत्यू होत असून, गेल्या चोवीस तासांत तब्बल 82 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यापैकी 25 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत.