प्रभात वृत्तसेवा पुणे – माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. मेट्रो रेल्वेच्या सुरक्षितता व तांत्रिक मानकांची पडताळणी करणाऱ्या रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनची (आरडीएसओ)ची अनिवार्य तपासणी नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. मेट्रो सुरू करण्यापूर्वीची ही तपासणी महत्त्वाची मानली जाते.माण- हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणारा एक महत्त्वाचा उपक्रम असलेल्या पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आहे. यापूर्वी या मेट्रोची चार स्टेशनपर्यंत चार ते पाच वेळा चाचणी घेण्यात आली. नुकत्याच झालेल्या आरडीओच्या तपासणीमुळे ही मेट्रो कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. प्रत्येक शहराची मेट्रो वेगवेगळ्या कंपन्यांनी बनवलेली असू शकते. हे नवीन तंत्रज्ञान भारतीय वातावरणात आणि ट्रॅकवर योग्यरित्या काम करेल, याची खात्री करण्याचे काम आरडीएसओ करते. भारतात धावणाऱ्या प्रत्येक मेट्रोची संरचना, डब्यांची रुंदी, ट्रॅकचे मोजमाप आणि वीज पुरवठा यंत्रणा ही सुरक्षित आहे की नाही, हे तपासण्यासाठी आरडीएसओकडे ठराविक मानके असतात. मेट्रो या मानकांवर उतरते की नाही, हे पाहणे आवश्यक असते. मेट्रोमध्ये दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. वळणे, आपत्कालीन ब्रेक यंत्रणा आणि डब्यांची स्थिरता यांची कठोर चाचणी आरडीएसओद्वारे केली जाते. त्यांच्या प्रमाणपत्राशिवाय मेट्रो प्रवाशांसाठी सुरू करता येत नाही. मेट्रो जेव्हा रुळांवरून वेगाने धावते, तेव्हा तिची हालचाल मर्यादेत आहे की नाही हे तपासले जाते. आरडीएसओचे तज्ज्ञ अत्याधुनिक उपकरणांद्वारे या चाचण्या करतात. त्यामुळे ही तपासणी महत्त्वाची आहे.पीएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या मेट्रो गाड्यांच्या पुरवठ्यातही समाधानकारक प्रगती झाली आहे. आतापर्यंत १४ मेट्रो ट्रेनसेट्स प्राप्त झाले असून, मंजूर वेळापत्रकानुसार एकूण २२ गाड्या लवकरच उपलब्ध होणार आहेत. या गाड्यांच्या आधारे टप्प्याटप्प्याने चाचण्या, ट्रायल रन आणि पुढे नियमित प्रवासी सेवा सुरू करण्याची तयारी केली जाणार आहे. साधारपणपणे मार्च 2026 पर्यंत या मेट्रोचे काही स्टेशनचे काम पूर्ण करून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.