पिंपरी (प्रतिनिधी) – “करोना’चे संकट थैमान घालत असताना श्रद्धेपोटी नागरिकांनी प्रार्थनेसाठी घराबाहेर पडून चर्चमध्ये येऊ नये, यासाठी शहरातील बहुतांश चर्चने अभिनव उपक्रम राबवित भाविकांना घरातूनच “गुड फ्रायडे’ची ऑनलाइन प्रार्थना घडविली. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.10) तंत्रज्ञानाचा वापर करून घरातच गुड फ्रायडे या सणाची ऑनलाइन उपासना (ता.10) करण्यात आली. यावेळी बायबलमधील विशेष संदेश देण्यात आला.
“करोना’ने सध्या संपूर्ण जगास “लॉकडाऊन’ केले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच रहावे, असे आवाहन वारंवार शासन आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. “करोना’च्या पार्श्वभूमीवर विविध चर्च बंद आहेत. भाविकांनी घराबाहेरही पडू नये आणि प्रार्थनाही करता यावी, याची व्यवस्था चर्चकडून करण्यात आली. लॉकडाउनमध्ये गर्दी टाळली जावी, प्रशासनाला त्रास होऊ नये, याची दक्षता घेत विविध नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक चर्चमधून यंदा प्रथमच फेसबुक, इन्स्टाग्राम, झूम ऍप, यू ट्यूब लाइव्हच्या माध्यमातून गुड फ्रायडेची उपासना भक्तीभावाने करण्यात आली. ख्रिस्ती धर्मगुरुंनी उत्तम शुक्रवारनिमित्तचे “सात शब्दावर’ संदेश दिला. सर्व ख्रिस्ती बांधवांनी भक्तीभावाने घरी बसून लॅपटॉप, मोबाइलवरून वचन श्रवण केले.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी प्रार्थना
पिंपरी येथील दि युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्टचे रेव्हरंड सुधीर पारकर, काळेवाडीतील केडीसी चर्चचे रेव्हरंड सुनिल चोपडे, खडकी येथील दि सेंट मेरी कॅथेड्रलचे रेव्हरंड सुनिल राउत, पिंपरीगावातील हिंदुस्थांनी कॉव्हेनंट चर्चमध्ये पास्टर येशूदास कालेकर, दि ऍफ्लीकेटेड कन्सोलर अवरलेडी चर्च फादर अमृत फन्सेका, चिंचवड स्टेशनजवळील सेंट झेवियर चर्च, निगडीतील इन्फंट जीजस चर्चने ऑनलाइन प्रार्थना घेतली. तसेच यावेळी करोना या व्हायरसपासून बचाव होण्यासाठी तसेच पोलीस, डॉक्टर, नर्स, अत्यावश्यक सेवेतील काम करणारे सर्वच कर्मचाऱ्यांसाठी प्रार्थना करण्यात आली.