पिंपरी | धुलीवंदन, गुड फ्रायडेला कर संकलन कार्यालये सुरु राहणार

पिंपरी, (प्रतिनिधी) – धुलीवंदन (दि. 25 मार्च) आणि गुड फ्रायडे (दि. 29 मार्च) या दिवशी महापालिकेला शासकीय सुट्टी आहे. मात्र, या दोन्ही दिवशी नागरिकांच्या सोयीसाठी कर संकलन कार्यालये सुरू राहणार आहेत.कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने कर वसुलीचे 1 हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 31 मार्चपर्यंत कर संकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी 17 विभागीय कार्यालये आणि ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी कर भरण्यासाठी वेळ वाढविण्यात आली आहे. 24 मार्चपर्यंत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कॅश काऊंटर सुरू ठेवण्यात येणार आहेत.
तर 25 ते 31 मार्चपर्यंत सकाळी 9.45 ते रात्री 8 वाजेपर्यंत कॅश काऊंटरवर मालमत्ता कराचा भरणा स्विकारला जाणार आहे, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.





