shivshahi accident : शिवशाही बस अपघातात महिला पोलिसाचा मृत्यू; 3 महिन्यापूर्वीच पोलिस दलात झाल्या होत्या भरती

Gondia shivshahi bus accident : गोंदिया जिल्ह्यातील डव्वा-खजरी गावाजवळ झालेल्या शिवशाही एस.टी. बस अपघातात 11 प्रवासी मृत्यू पावले आहेत. यामध्ये अर्जुनी मोरगाव येथील महिला पोलिस स्मिता सुर्यवंशी यांचाही मृत्यू झाला. तीन महिन्यांपूर्वीच त्या पोलीस दलात भरती झाल्या होत्या. या दुर्घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
स्मिता सुर्यवंशी यांचे पती पोलीस विभागातच कार्यरत होते. त्यांचे यापूर्वीच आजाराने निधन झाले होते. आपले सासू सासरे व एका छोट्याशा बाळासह हलाखीचे जीवन जगत असताना स्मिता यांना पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस शिपाई म्हणून तीन महिन्यापूर्वीच नोकरी मिळाली होती. आपले परिवारांना भेटून स्मिता आज 29 नोव्हेंबरला आपल्या नोकरीवर जाण्यासाठी अर्जुनी मोरगाव वरुन साकोलीला गेल्या आणि गोंदियाला जाण्यासाठी याच बसने जात असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेत स्मिता यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन प्रशासनाला दिले आहेत. सध्या मृतांचा आकडा 11 वर असला तरी अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.
शिवशाही बस अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांची नावे –
1) स्मिता विक्की सुर्यवंशी, वय- 32 वर्ष, राहणार- अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया
2) मंगला राजेश लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे, वय- 65 वर्ष, राहणार- वरोरा, जि.चंद्रपूर
5) रामचंद्र कनोजे, वय- 65 वर्ष, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
6) अंजिरा रामचंद्र कनोजे, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
7) आरिफा अजहर सय्यद, वय- 42 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
8) अजहर अली सय्यद, वय- 45 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
9) नयना विशाल मिटकर, वय- 35 वर्ष, राहणार- बेसा, नागपूर
– मृत्यू पावलेल्या 2 प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही




