Gondia News : धक्कादायक! मुलाचे पिंडदान करताना आईसह तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू

गोंदिया : मुलाच्या पिंडदानासाठी तालुक्याच्या कोरणी घाटावर गेलेल्या आई व दोन मावस बहिणींचा कोरणी घाटातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२:३० वाजता घडली. मीरा ईसुलाल तुरकर (५५), मीनाक्षी संतोष बघेले (३६) व स्मिता शत्रुघ्न टेंभरे (३९, तिघीही रा. नागपूर) अशी मृत महिलांची नावे आहेत.
मृत मीरा ईसुलाल तुरकर यांचा मुलगा मुकेश तुरकर याचे ३० मे २०२५ रोजी आजाराने निधन झाल्याने त्याच्या पिंडदानासाठी गोंदिया तालुक्याच्या कोरणी घाटावर रविवारी दुपारी २० ते २५ लोक आले होते. दुपारी १२.३० वाजता पूजा करण्यापूर्वी आंघोळीसाठी महिला मंडळी घाटात उतरल्या. मुकेशची वहिनी गायत्री राजेश तुरकर या आंघोळ करताना त्यांचा पाय घसरल्याने त्या पाण्यात पडल्या.
त्यांना वाचवण्यासाठी मीनाक्षी संतोष बघेले हिने पाण्यात उडी घेतली. परंतु तीही बडाली. दोघीही बुडत असल्याचे पाहून स्मिता शत्रुघ्न टेंभरे हिने पाण्यात उडी घेत वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तीदेखील पाण्यात बुडाली. तिघी बुडत असल्याचे पाहून मीरा ईसुलाल तुरकर यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असताना या प्रयत्नात त्या स्वत:चा जीव गमावून बसल्या.





