Marathi Film Gondhal : मराठी चित्रपट सृष्टीसाठी सर्वात मोठी बातमी; ऑस्कर 2027 साठी 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची भारताकडून अधिकृत निवड
Marathi Film Gondhal : मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली. 33 चित्रपटांमधून FFI ज्युरीने ‘गोंधळ’ची निवड केली.

Marathi Film Gondhal : मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची 99व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) शुक्रवारी ही घोषणा केली. ‘गोंधळ’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपट या विभागात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
यंदा भारताकडून ऑस्करसाठी एकूण 33 चित्रपटांचा विचार करण्यात आला. त्यात 14 हिंदी, तर मराठी, तेलुगू आणि गुजराती भाषेतील प्रत्येकी चार चित्रपटांचा समावेश होता. तमिळ भाषेतील तीन, तसेच मल्याळम आणि नागामी भाषेतील चित्रपटही शर्यतीत होते. त्यातून संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली.
ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘गोंधळ’ हा मानसशास्त्रीय थ्रिलर आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक ‘गोंधळ’ विधीभोवती चित्रपटाची कथा फिरते. नवविवाहित जोडप्याच्या घरी रात्रभर चालणाऱ्या या विधीदरम्यान गावातील जुने वाद, वैयक्तिक संघर्ष आणि तणाव समोर येतात. पुढे या घटनांना गुन्हे आणि रहस्याची किनार मिळते.
चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, सुरेश विश्वकर्मा, निषाद भोईर आणि अनुज प्रभू यांच्या भूमिका आहेत. ‘गोंधळ’ला यापूर्वी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही गौरव मिळाला आहे. 2025 मधील गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) संतोष डावखर यांना ‘सिल्व्हर पीकॉक’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
ऑस्करसाठी निवड होणे ही अंतिम नामांकनाची खात्री नाही. पुढील टप्प्यात अकादमीकडून आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपट विभागासाठी निवड प्रक्रिया होईल. 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 रोजी होणार आहे.
यापूर्वी 2025 मध्ये ‘होमबाउंड’ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली होती. ‘गोंधळ’ची निवड झाल्याने मराठी चित्रपटाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.





