Gondhal Film: ऑस्करमध्ये एन्ट्री केलेला ‘गोंधळ’ चित्रपट सहा भाषांमध्ये होणार रिलीज
Gondhal Film: संतोष डावखर यांनी 'गोंधळ' चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली

Gondhal Film: यंदाच्या ९९ व्या अकादमी अवॉर्ड्ससाठी भारताने ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म’ श्रेणीसाठी पाठवलेला ‘गोंधळ’ हा चित्रपट आता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. ‘गोंधळ’ या चित्रपटाने ऑस्करसाठी भारताची अधिकृत एन्ट्री मिळवताना इतर ३३ चित्रपटांना मागे टाकलं आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची आणि त्यातील गोंधळ या परंपरेची मोठी चर्चा आहे.
संतोष डावखर यांनी या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. ‘गोंधळ’ हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कथा महाराष्ट्रातील पारंपरिक गोंधळ या धार्मिक विधीभोवती फिरते. गोंधळ ही महाराष्ट्रातील एक पारंपरिक धार्मिक प्रथा आहे. या विधीमध्ये देवी-देवतांची पूजा, भजन, संगीत आणि नृत्य यांचा समावेश असतो. गोंधळ घालण्याचं काम पारंपरिकरित्या गोंधळी समाजातील कलाकार करतात.
संतोष डावखर म्हणाले, “आम्ही ‘गोंधळ’ बनवण्यास सुरुवात केली, तेव्हा आमचे एकमेव ध्येय आमच्या मातीतील अस्सल संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवणे हे होते. या लोककथेवर आधारित या चित्रपटाची भारताची अधिकृत एंट्री म्हणून ऑस्करला पाठवण्यात आला हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. आता १३ नोव्हेंबर रोजी पॅन-इंडिया रिलीजच्या माध्यमातून हा चित्रपट देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.”
‘गोंधळ’ चित्रपटात अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, ऐश्वर्या शिंदे, शरद जाधव, पूनम पाटील कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, आणि ध्रुव ठोके या कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
गोंधळ चित्रपटाची कथा
चित्रपटाची कथा ग्रामीण महाराष्ट्रात मध्यरात्री सुरू असलेल्या गोंधळाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुढे जाते. चित्रपटात इशिता देशमुख या सुमन नावाच्या महिलेची भूमिका साकारत आहेत. सुमनचं एका श्रीमंत कुटुंबात लग्न झालेलं असतं. मात्र, लग्नानंतरच्या आयुष्यामुळे ती त्रस्त असते. याच काळात तिची भेट साहेबा नावाच्या एका गोंधळी कलाकाराशी होते. यानंतर सुमनच्या आयुष्यात अनेक घटना घडतात. नातेसंबंध, विश्वासघात, फसवणूक आणि हत्येच्या कटापर्यंत ही कथा पोहोचते. या संपूर्ण कथेत रात्री चालणारा गोंधळाचा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावतो.
हेही वाचा:





