Gold Smuggling Case: अभिनेत्री रान्या रावचं कांड सावत्र वडील IPS रामचंद्र राव यांना भोवलं; तात्काळ रजेवर पाठवलं

Gold Smuggling Case: कर्नाटक सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे ज्यात अभिनेत्री रान्या रावचे सावत्र वडील डीजीपी रामचंद्र राव यांना त्यांच्या सावत्र मुलीला सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात नुकतीच अटक झाल्यानंतर तात्काळ रजेवर पाठवण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही.के. शरथ चंद्र यांची कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड, बेंगळुरूचे अध्यक्ष आणि MD म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, हे पद पूर्वी रान्याच्या सावत्र वडिलांकडे होते. रान्याच्या प्रकरणात रामचंद्र राव यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. त्यावरून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
रान्या रावने केला मारहाणीचा आरोप –
यापूर्वी सोन्याच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी कन्नड अभिनेत्री हर्षवर्धिनी रान्या राव हिने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी तिच्यावर हल्ला केला आणि कोऱ्या आणि टाईप केलेल्या कागदांवर सह्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे.
बेंगळुरूमधील डीआरआयच्या अतिरिक्त महासंचालकांना 6 मार्च रोजी लिहिलेल्या पत्रात रान्याने दावा केला आहे की तिच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुबईहून परतताना 14 किलोपेक्षा जास्त सोने बाळगल्याचा चुकीचा आरोप तिच्यावर लावण्यात आल्याचे तिने सांगितले.
या प्रकरणात मी निर्दोष असल्याचे तुमच्या अधिकाऱ्यांनी मला सांगू दिले नाही, असा आरोप हर्षवर्धिनी रान्या उर्फ रान्या राव हिने केला आहे. अभिनेत्रीने पुढे दावा केला की, तिला ताब्यात घेतल्यापासून ते कोर्टात हजर करेपर्यंत तिच्या चेहऱ्यावर 10 ते 15 चापट मारण्यात आली.
रान्या रावचा जामीन फेटाळला –
सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटमध्ये कर्नाटक पोलिस प्रोटोकॉल ऑफिसरचा वापर करण्यात आला होता, असे डीआरआयने कोर्टात सांगितल्यामुळे अभिनेत्री रन्या रावला शनिवारी जामीन नाकारण्यात आला. रान्याला जामीन देण्याच्या विरोधात युक्तिवाद करताना, केंद्रीय एजन्सीने आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयाला सांगितले की आरोपीने या वर्षी जानेवारीपासून 27 वेळा दुबईला प्रवास केला आहे.
“आतापर्यंतच्या तपासात सोन्याच्या तस्करीत वापरलेली अत्याधुनिक पद्धती, सुरक्षेला बाधा आणण्यासाठी राज्य पोलीस प्रोटोकॉल अधिकाऱ्यांचा वापर, सोने खरेदी करण्यासाठी भारतातून दुबईला निधी हस्तांतरित करण्यासाठी हवाला व्यवहार आणि मोठ्या सिंडिकेटचा सहभाग उघड झाला आहे,” असे डीआरआयने सांगितले आहे.
दरम्यान, रान्या राव 3 मार्च रोजी दुबईवरून बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. तिने 15 दिवसात दुबईच्या चार ट्रिप केल्या. त्यामुळे तिच्यावरील संशय बळावला. बंगळुरू एअरपोर्टवर तिच्या मदतीसाठी बसवराजू नावाचा एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात होता. त्याच्याच मदतीने तिने सेक्युरिटी चेकिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. डीआरआयची तिच्यावर नजर होतीच. डीआरआयने तिची चौकशी केली आणि तिला सोन्यासह पकडलं. तपासावेळी तिच्या जॅकेटमध्ये लपवलेले विदेशातील 14.2 किलोग्रॅमचं सोनं सापडलं. त्याची किंमत सुमारे 12.56 कोटी इतकी आहे.
रान्या राव कोण आहे?
रान्या राव ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचं फिल्मी करिअर फार चाललं नाही. 2014मध्ये माणिक्या या कन्नड सिनेमातून तिने फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. पण सिनेमात फारसं यश नाही आल्याने तिने फिल्मी दुनियेला राम राम ठोकला होता. माणिक्यामध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीचा रोल केला होता. पण तामिळमधील वाघा सिनेमात ती मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर 2017मध्ये आलेल्या पटाकी या कन्नड सिनेमात तिने सहाय्यक अभिनेत्रीचा रोल केला होता. पण तिच्या तिन्ही सिनेमांना फारसं यश आलं नाही. 2017मध्येच तिचं फिल्मी करिअर संपलं. त्यानंतर तिला काहीच काम मिळत नव्हतं.




