Gold-Silver Rates: लग्नसराईच्या मागणीने सोने-चांदी दरात उसळी; जागतिक अनिश्चिततेत गुंतवणूकदार सावध
Gold-Silver Rates: दिल्ली सराफात सोन्याचा दर 3,700 रुपयांनी म्हणजे 2.5 टक्क्यांनी वाढून 1 लाख 51 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

Gold-Silver Rates: -सरलेल्या महिन्यांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात बरीच घट झाली. मात्र लग्नासाठी खरेदी वाढल्यामुळे सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 3,700 रुपयांनी म्हणजे 2.5 टक्क्यांनी वाढून 1 लाख 51 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा दर 7,000 रुपयांनी म्हणजे तीन टक्क्यांनी वाढून 2 लाख 37 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
सरलेल्या महिन्यांमध्ये सोन्याचा दर 21 हजार 300 रुपयांनी म्हणजे 12.3 टक्क्यांनी तर चांदीचा दर 21 टक्क्यांनी म्हणजे 63 हजार रुपयांनी कमी झाला आहे. आखातातील युद्ध जास्तच चिघाळल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून जागतिक गुंतवणूकदार सोने आणि चांदीऐवजी डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यांची खरेदी करीत असल्यामुळे या दोन धातूच्या दरात या महिन्यात घट झाली.
जागतिक बाजारात सोमवारी सोन्याचा दर 38 डॉलरने म्हणजे एक टक्क्यांने वाढून 4,531 डॉलर आणि चांदीचा दर 1.35 टक्क्यांनी वाढून 70.72 डॉलर प्रति औंसावर गेला होता. मात्र परिस्थिती फारच लवचिक आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार या दोन धातूपासून दूर राहण्याची शक्यता आहे.




