Gold-Silver Rates: ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 1500 रुपयांनी, म्हणजेच 1 टक्क्याने वाढून 1,56,800 रुपये झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीज विभागाचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, कमकुवत भारतीय रुपया आणि अस्थिर वातावरणामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 35 पैशांनी घसरून 95.63 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला, ज्यामुळे देशांतर्गत सोन्याच्या किमतींना मजबूत आधार मिळत राहिला, असे त्यांनी सांगितले. चांदीच्या दरातही 12,000 रुपयांची, म्हणजेच 4.53 टक्क्यांची वाढ होऊन तो 2,77,000 रुपये प्रति किलो (सर्व करांसहित) झाला. लेमन मार्केट्स डेस्कचे संशोधन विश्लेषक गौरव गर्ग म्हणाले की, परदेशी बाजारात स्पॉट सोन्याचा भाव 42.33 डॉलरने, म्हणजेच 1 टक्क्याने घसरून 4,692.64 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीचा भाव 3.04 टक्क्यांनी घसरून 83.49 डॉलर प्रति औंस झाला. ब्रोकरेज फर्म कोटक सिक्युरिटीजने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव तीन आठवड्यांच्या उच्चांकावरून घसरून प्रति औंस 4,700 डॉलर्सच्या जवळपास आला आहे, तर मजबूत डॉलर आणि वाढत्या ट्रेझरी बाँड यील्ड्सच्या दबावामुळे स्पॉट चांदीचा भाव 85 अमेरिकन डॉलर्सच्या खाली घसरला आहे. रुपया घसरुन नव्या निचांकी पातळीवर – अमेरिका आणि इराण यांच्यातील नव्याने निर्माण झालेल्या तणावामुळे मंगळवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 35 पैशांनी घसरून 95.63 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला. 10 आठवडे सुरू असलेल्या या संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठा आणखी कमी होऊ शकतो, या भीतीमुळे बाजारातील वातावरण प्रभावित झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवड्याच्या शेवटी इंधन बचत आणि आयात कमी करण्याबाबत केलेल्या वक्तव्यांचा अर्थ असा लावला की, जर कच्च्या तेलाच्या किमती जास्त काळ वाढलेल्या राहिल्या तर भारताची व्यापार तूट आणखी वाढू शकते, याची ही एक अप्रत्यक्ष कबुली आहे. सोमवारी, रुपया 79 पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरसमोर 95.28 या विक्रमी नीचांकी पातळीवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि मजबूत डॉलरमुळे रुपया आणखी खाली खेचला जाऊ शकतो. तथापि, आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे रुपयाला खालच्या पातळीवर आधार मिळू शकतोअसे मिराई असेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, सहा चलनांच्या बास्केटच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर इंडेक्स 0.33 टक्क्यांनी वाढून 98.28 वर व्यवहार करत होता. जागतिक तेल बेंचमार्क असलेल्या ब्रेंट क्रूडच्या दरात फ्युचर्स ट्रेडमध्ये 3.09 टक्क्यांनी वाढ होऊन तो प्रति बॅरल 107.43 डॉलरवर पोहोचला. ज्यामुळे पुरवठ्यात व्यत्यय आणि वाढत्या ऊर्जा खर्चाची भीती निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी इंधनाचा जपून वापर करणे, सोन्याची खरेदी आणि परदेश प्रवास पुढे ढकलणे यासह इतर उपाययोजना करण्याचे आवाहन केले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी 8,437.56 कोटी रुपयांच्या इक्विटीची विक्री केली त्याचा रुपयावर परिणाम झाला.