नवी दिल्ली – जागतिक पातळीवर सोन्याची पीछेहाट चालू आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत भारतात सोने आणि चांदीच्या दरात बरीच घट नोंदणी गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 372 रुपयांनी कमी होऊन 50,139 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दर 799 रुपयांनी कमी होऊन 56,059 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक पातळीवर सोन्याचा दर कमी होऊन 1,621 डॉलर व चांदीचा दर 18.41 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, सोन्याच्या इटीएफमधून गुंतवणूक काढली जात आहे आणि ही गुंतवणूक डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्याकडे वळत आहे.
त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होत आहेत. भारतात दिवाळीत सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. सोन्याचे दर कमी होत असल्यामुळे भारतीयाना सोने खरेदी करण्याची संधी आहे. दरम्यान यावर्षी दिवाळीत सोन्याची खरेदी 20% पर्यंत वाढेल असा विश्वास बऱ्याच दागिने उत्पादकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे देशभरातील दागिने उत्पादकांनी दिवाळीत खरेदी वाढेल म्हणून तयारी केली आहे. ऐपत नसेल तर काही जण दिवाळीत प्रतीकात्मक स्वरूपात सोने खरेदी करतात.
दागिने उत्पादकांनी सांगितले की, ग्रामीण भागातील क्रयशक्तीवर विषम पावसामुळे काही प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात फारशी खरेदी होईल असे आम्हाला वाटत नाही. मात्र शहरांमध्ये एकूण परिस्थिती पाहता सोन्याची खरेदी वाढेल असे आम्हाला वाटते. भारतात सोन्याची निर्मिती होत नसल्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याचे जे दर असतात तेच दर भारतामध्ये असतात.