नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार भारतीय सराफात मंगळवारी सोन्याचे दर 195 रुपयांनी कमी होऊन 49,580 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. तयार चांदीचा दर दिल्ली सराफात 195 रुपयांनी कमी होऊन 56,155 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,637 डॉलर व चांदीचा दर 18.69 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. या घडामोडीबाबत एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, भारतामध्ये दसरा आणि दिवाळीमध्ये सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी होणाऱ्या सोन्याचा दराचा भारतीय नागरिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होत आहेत. कारण डॉलर वधारत आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. बरीच गुंतवणूक डॉलर आणि कर्जरोख्याकडे जात आहे. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होऊन जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जागतिक तणाव वाढण्याच्या अनेक शक्यता आहेत. अशा परिस्थितीमध्ये सोन्याचा दर वाढू शकतो.