नवी दिल्ली – जागतिक पातळीवर शेअर बाजाराचे निर्देशांक एकतर्फी कोसळत असल्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत सोमवारी सोन्याचा दर 350 रुपयांनी वाढून 89,100 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. चांदीचा जर अगोदरच एक लाख रुपये प्रति किलो या पातळीवर आहे. त्यामुळे आज चांदीच्या दरात फारसा फरक पडला नाही. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले की, अनेक देशांदरम्यान तणाव चालू असतानाच अमेरिकेने व्यापार धोरणात तणाव निर्माण केला आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीचे आकर्षण वाढले आहे. त्यामुळे मध्यम ते दीर्घ पल्ल्यात सोने आणि चांदीचे दर वाढत राहण्याची जास्त शक्यता आहे. अगोदर डॉलर वधारत होता. मात्र गेल्या तीन आठवड्यापासून डॉलर इतर सहा चलनाच्या तुलनेत कमकुवत होत आहे. त्यामुळे सोन्याचे आकर्षण मूल्य आणखी वाढले आहे. या कारणामुळे जागतिक वायदे बाजारात सोन्याचा दर सध्या 2,954 डॉलर आणि चांदीचा दर 33.20 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेत असलेल्या भूमिकेमुळे सध्याच्या परिस्थितीत नजीकच्या भविष्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता कमी आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था कमकुवत होत असल्याची आकडेवारी जाहीर झाल्यामुळेही सोन्याची मागणी देशात आणि परदेशात वाढत राहण्याची शक्यता आहे.