Gold-Silver Crash: पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती असतानाही सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. सामान्यतः जागतिक तणावाच्या काळात गुंतवणूकदार सोने-चांदीसारख्या सुरक्षित धातूंकडे वळतात. मात्र यावेळी नेमके उलट घडल्याने अनेक गुंतवणूकदार अचंबित झाले आहेत. MCX वरील भाव किती घसरले? सोमवारी दुपारी सुमारे ३.१५ वाजता MCX वर सोन्याचा वायदा भाव १,३४,०४२ रुपयांवर होता. हा भाव १०,४२० रुपयांनी म्हणजेच ७.२५ टक्क्यांनी खाली आला होता. तर चांदीचा वायदा भाव २,०५,४३९ रुपयांवर होता, जो २१,१७२ रुपयांनी म्हणजेच ९.४३ टक्क्यांनी घसरला होता. शुक्रवारच्या बंद भावाशी तुलना केल्यास सोमवारी सोनं सुमारे १५,००० रुपये आणि चांदी तब्बल २७,००० रुपयांनी कोसळली आहे. घसरणीची ५ प्रमुख कारणे – Gold-Silver Crash १. इराणची इशारावजा धमकी – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या पाॅवरग्रिडवर हल्ल्याची धमकी दिल्यानंतर इराणने प्रत्युत्तरात आखाती देशांच्या ऊर्जा आणि जलपुरवठा पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचा इशारा दिला आहे. या परस्पर धमक्यांमुळे बाजारात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. २. होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा – इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने स्पष्ट केले आहे की इराणच्या वीजप्रकल्पांवर हल्ला झाल्यास होर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केली जाईल. जागतिक तेल पुरवठ्यासाठी ही सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची असल्याने बाजारात चिंतेचे वातावरण आहे. ३. कच्च्या तेलाचे वाढते दर – सध्या कच्च्या तेलाचा भाव ११० डॉलर प्रति बॅरलवर आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ल्याच्या परस्पर धमक्यांमुळे गुंतवणूकदारांची चिंता आणखी वाढली आहे. ४. जागतिक शेयर बाजारांत दबाव – अमेरिका आणि आशियातील शेयर बाजारही घसरणीत आहेत. अमेरिकन फ्युचर्स निराशाजनक असून आशियाई बाजारही नकारात्मक सुरुवातीसह उघडले. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये जोखीम टाळण्याचा कल वाढला आहे. ५. व्याजदरांबाबत अनिश्चितता – अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या पुढील निर्णयाबाबत गुंतवणूकदार सावध आहेत. व्याजदर वाढण्याची शक्यता असल्याने सोने-चांदीसारख्या धातूंचे आकर्षण कमी होते, असे बाजार विश्लेषकांचे मत आहे. जागतिक बाजारातही मोठी घसरण – Gold-Silver Crash जागतिक बाजारातही याच प्रवृत्तीचे प्रतिबिंब दिसत आहे. स्पॉट गोल्ड सुमारे ४,३७२ डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आले, जे सुमारे २.५ टक्क्यांची घसरण आहे. तर अमेरिकन गोल्ड फ्युचर्समध्ये सुमारे ४.४ टक्क्यांची घट झाली. सोन्याचा भाव सलग नऊ व्यापारी सत्रांपासून घसरत असून हा जानेवारीच्या सुरुवातीनंतरचा नीचांकी स्तर आहे. केवळ एका आठवड्यात सोन्याच्या किमतींमध्ये १० टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली आहे. सर्वच गुंतवणूक प्रकारांत विक्री – Geojit Investments Limited चे मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले की जागतिक स्तरावर वाढलेल्या जोखमीचा फटका शेयर्स, बॉन्ड्स आणि सोने-चांदी या सर्वच गुंतवणूक प्रकारांना बसला आहे. ते म्हणाले, “कधीकधी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्यातील घसरण शेयर बाजारापेक्षाही जास्त असते. या अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये.” गुंतवणूकदारांनी काय करावे? तज्ज्ञांच्या मते, सध्याची घसरण म्हणजे सोने-चांदीचा दीर्घकालीन कल बदलला असे नाही. गेल्या काही महिन्यांत भू-राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या उच्च किमतींमुळे मोठ्या प्रमाणात खरेदी झाली होती, त्यामुळे आता बाजार समतोलाकडे वाटचाल करत आहे. जोपर्यंत जागतिक तणाव आणि व्याजदरांबाबत अनिश्चितता कायम राहील, तोपर्यंत बाजारात चढउतार सुरूच राहू शकतात. गुंतवणूकदारांनी अल्पकालीन घसरणीवर घाईघाईने प्रतिक्रिया न देता दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे फायदेशीर ठरेल.