Gold Silver Prices: व्यापार युद्धामुळे आणि डॉलर घसरत असल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीचे आकर्षण वाढले आहे. अशा परिस्थितीत या दोन धातूच्या दरात गेल्या पंधरवड्यात बरीच वाढ झाली आहे. यात आज खंड पडला नाही. बुधवारी सोन्याचा दर 60 रुपयांनी वाढून 88,850 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर तेराशे रुपयांनी वाढून 1 लाख 200 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे अगोदर अमेरिकन शेअर बाजार वाढत होते. त्याचबरोबर डॉलर वधारत होता. मात्र आता व्यापार युद्धामुळे संभ्रम निर्माण झाला असून शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत. त्याचबरोबर डॉलर कमकुवत होत आहे. अशा परिस्थितीत या दोन धातूतील गुंतवणूक वाढत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन धातूच्या दरात वाढ होत असल्याचे विश्लेषकानी सांगितले.जागतिक वायदेबाजारात सोन्याचा दर 2,921 डॉलर आणि चांदीचा दर 33.03 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे. त्यामुळे दीर्घ पल्ल्यात या दोन धातूचे दर वाढत राहण्याची शक्यता आहे. जोपर्यंत व्यापार युद्ध निवळत नाही तोपर्यंत सोने आणि चांदीचे आकर्षण कायम राहणार असल्याचे सांगण्यात येते.