नवी दिल्ली – सध्या सोने आणि चांदीचे दर उच्च पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदारांनी नफा काढून घेणे पसंत केले. त्यामुळे दिल्ली सराफात गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात बरीच घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 1,150 रुपयांनी कमी होऊन 88,200 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. चांदीचा दरही 1,000 रुपयांनी कमी होऊन 98,500 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. बुधवारी महाशिवरात्रीमुळे सोने आणि चांदीचे बाजार बंद होते. अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार जागतिक बाजारात नफेखोरीमुळे सोन्याची मागणी कमी आणि विक्री जास्त होती. अशा परिस्थितीत सोन्याचा दर काही प्रमाणात कमी झाला. व्यापार्यांनी सांगितले की, सोनेे आणि चांदीच्या दरात आता बरीच वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात या वाढीला मर्यादा येतील असे ज्या गुंतवणूकदारांना वाटत आहे, त्या गुंतवणूकदारांनी सध्याच्या पातळीवर नफा काढून घेणे पसंत केले, त्यामुळे या दोन धातूच्य दरात घट झाली. जागतिक पातळीवर व्यापार युद्ध चालू आहे. अशा परिस्थितीत विविध देशातील औद्योगिक उत्पादनावर याचा काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. या कारणामुळे चांदीला मागणी मंद असल्यामुळे चांदीच्या दरात घट झाली असल्याचे सांगण्यात आले. व्यापार युद्ध, अनेक देशांदरम्यानचे युद्ध आणि जागतिक पातळीवर वाढलेली महागाई या कारणामुळे आगामी काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. ऑक्टोबरपासून सोने आणि चांदीच्या दरात इतर वित्तीय साधनाच्या तुलनेत जास्त वाढ झाली आहे. तर शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले आहेत. नफेखोरी तात्पुरत्या स्वरूपाची – काही विश्लेषकांनी सांगितले की, सध्याची नफेखोरी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. दीर्घ ते मध्यम पल्ल्यात सोने- चांदीचे दर उच्च पातळीवर राहण्याची जास्त शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिको विरोधातील आयात शुल्क अंमलबजावणी एक महिना पुढे ढकलली असल्यामुळेही डॉलर कमकुवत झाला. त्याचबरोबर सोने आणि चांदीची खरेदी कमी झाली. मात्र ट्रम्प अनपेक्षित पणे अनेक घोषणा करू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांचे त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष राहणार आहे. आता त्यांनी युरोप विरोधात 25 टक्के आयात शुल्क लावण्याची धमकी दिली आहे.