नवी दिल्ली – अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार दिल्ली सराफात मंगळवारी सोन्याचा दर 250 रुपयांनी वाढून 89,350 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. रुपयाचे मूल्य आज 51 पैशांनी कोसळल्यामुळे आयात महागात पडणार असल्यामुळे सोन्याचे दर वाढले असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. भारत आपल्या गरजेचे बहुतांश सोने आयात करतो. डॉलर वधारल्यामुळे आणि रुपया घसरल्यामुळे आयात सोन्याला जास्त रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान दिल्ली सराफात चांदीचा दर पाचशे रुपयांनी कमी होऊन 99,500 रुपये प्रति किलो झाला. जागतिक मंदीमुळे औद्योगिक क्षेत्रातून मागणी कमी झाल्यामुळे आणि चांदीचे जर अगोदरच जास्त असल्यामुळे नफेखोरी झाल्यामुळे चांदीचे दर कमी झाले असल्याचे मेहता इक्विटीज या संस्थेचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री यांनी सांगितले. दरम्यान देशातील आणि परदेशातील वायदे बाजारात सोने आणि चांदीचे दर अजूनही जास्त पातळीवर आहेत. कारण जागतिक बाजारात अस्थिरता रेंंगाळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मध्यम ते दीर्घ पल्ल्याधात या दोन धातूचे दर जास्त पातळीवर राहण्याची शक्यता असल्याचे एलकेपी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक जतिन त्रिवेदी यांनी सांगितले.