नवी दिल्ली – सध्या सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदारांनी सोने -चांदीची विक्री करून नफा काढून घेतला. त्यामुळे या दोन धातूच्या दरात माफक प्रमाणात घट झाली असल्याचे दिसून आले. दिल्ली सराफात सोन्याचा दर 700 रुपयांनी कमी होऊन 88,750 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर तीनशे रुपयांनी कमी होऊन एक लाख रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. अखिल भारतीय सराफा असोसिएशनने या संदर्भात जारी केलेल्या माहितीत म्हटले की, उच्च पातळीवर दर असल्यामुळे गुंतवणूकदारांनी व दागिने उत्पादकाकडून मागणीऐवजी विक्री झाल्याने या दोन धातूच्या घरात घट झाली. मात्र मध्यम आणि दीर्घ पल्ल्यात या दोन धातूचे दर वाढत राहण्याची शक्यता बर्याच विश्लेषकांनी व्यक्त केली. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर गेल्या एक आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात एकतर्फी वाढ होत होती. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी सध्याच्या परिस्थितीत नफा काढून घेणे पसंत केले. मात्र हे दर दीर्घ पल्ल्यात जास्त पातळीवर राहण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदारांचे या बाजाराकडे लक्ष आहे. अमेरिकेत व्याजदर कपात लांबीवर पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी नफा काढून घेणे पसंत केले.