नवी दिल्ली – जगाचे आर्थिक इंजिन समजल्या जाणार्या अमेरिकेत मंदी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या बेफाम व्यापार युद्धामुळे हा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लघु पल्ल्यात तरी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. आतापर्यंत सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलर एक चांगला पर्याय होता. मात्र ट्रम्प यांच्या धोरणामुळे गेल्या पंधरा दिवसापासून डॉलर वेगाने कमकुवत होत आहे. आता डॉलर इंडेक्स 0.58 टक्क्यांनी कमी होऊन 103.35 अंकावर आला आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने भाव खात आहे. यामुळे देशात आणि परदेशात मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. ईटीएफच्या माध्यमातून सोन्यात बरीच गुंतवणूक वाढली आहे. त्याचबरोबर वायदे बाजारातही सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 40 रुपयांनी वाढून 88,790 प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. चांदीचा जर अगोदरच उच्च पातळीवर आहे. अशा परिस्थितीत चांदीचा दर 350 रुपयांनी कमी होऊन 98,900 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. मंदीच्या शक्यतेमुळे औद्योगिक क्षेत्राकडून चांदीची मागणी मर्यादित झाल्यामुळेही चांदीच्या दरावर परिणाम झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 2,912 डॉलर व चांदीचा दर 33 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे. अमेरिकेतील बेरोजगारी वाढली आहे. त्याचबरोबर तेथील महागाई जास्त पातळीवर राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अमेरिका व्याजदरात कपात करू शकणार नाही. तसेच या सर्व घटनाक्रमला जबाबदार असणारे डोनाल्ड ट्रम्प याबाबत ताठर भूमिका कायम ठेवत आहेत. अशा परिस्थितीत आयात शुल्क आणि इतर बाबीबाबत ट्रम्प काय भूमिका घेतात याकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.