Share Market: केंद्रीय अर्थसंकल्पातील कर वाढीच्या निर्णयामुळे हादरलेला भारतीय शेअर बाजार सोमवारी अवघ्या एका दिवसात सावरून पुन्हा तेजीत आला. व्यवहाराच्या शेवटच्या तासात रिलायन्स इंडस्ट्रीज, अदाणी पोर्ट्स आणि एचडीएफसी बँकेसारख्या बड्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजाराने मुसंडी मारली. मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ९४४ अंकांच्या वाढीसह ८१,६६६ वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारचा ‘निफ्टी’ २६३ अंकांनी वधारून २५,०८८ वर स्थिरावला. रविवार, १ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात ‘सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स’ (STT) मध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती. या धक्क्यामुळे रविवारी बाजार १.८ टक्क्यांनी कोसळला होता. मात्र, सोमवारी बाजाराने ही घसरण भरून काढत रिकवरी’ केली. बजेटमधील विकासाभिमुख धोरणे आणि वित्तीय शिस्तीमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक संदेश गेल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या शेअर्समध्ये राहिली तेजी – सेन्सेक्समध्ये प्रामुख्याने पॉवर ग्रिड, अदाणी पोर्ट्स, बीईएल (BEL), रिलायन्स इंडस्ट्रीज आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्स वधारले. दुसरीकडे, आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या इन्फोसिस आणि टीसीएससह ॲक्सिस बँक आणि ट्रेंटच्या शेअर्समध्ये मात्र काही प्रमाणात घसरण दिसून आली. कच्च्या तेलातील घसरणीचा फायदा – जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी घट भारतासाठी दिलासादायक ठरली आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्याची चिन्हे असल्याने तेलाच्या किमती कमी झाल्या असून, त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय रुपया आणि शेअर बाजारावर झाला आहे. दरम्यान, आज संध्याकाळपर्यंत बजाज हाऊसिंग फायनान्स, ह्युंदाई मोटर इंडिया, ओला इलेक्ट्रिक आणि टाटा केमिकल्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे (Q3) निकाल जाहीर होणार आहेत. या निकालांचा थेट परिणाम उद्याच्या बाजारावर होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय विशेष सत्रातील घसरण: रविवारी अर्थसंकल्पातील घोषणांनंतर सेन्सेक्समध्ये मोठी पडझड झाली. दिवसाअखेर सेन्सेक्स १,५४६.८४ अंकांनी म्हणजेच १.८८ टक्क्यांनी घसरून ८०,७२२.९४ या स्तरावर बंद झाला. निफ्टीमध्येही मोठी विक्री दिसून आली. निफ्टी ४९५.२० अंकांनी म्हणजेच १.९६ टक्क्यांनी कोसळून २४,८२५.४५ वर स्थिरावला होता. व्यवहारादरम्यान एका वेळी सेन्सेक्स तब्बल २,३७० अंकांनी कोसळला होता आणि त्याने ७९,८९९.४२ चा स्तर गाठला होता. निफ्टीदेखील व्यवहारादरम्यान २४,५७१.७५ पर्यंत खाली आला होता.