पुणे | श्री महालक्ष्मी देवीला आज सोन्याची साडी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात दसऱ्याच्या दिवशी शनिवारी (दि.१२) श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे.
सकाळपासून भाविकांना सोन्याची साडी परिधान केलेले देवीचे विलोभनीय रुप पाहण्याची आणि दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
तसेच रात्री ९.३० वाजता समाजातील महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर प्रतीकात्मक रावण दहन कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त आणि उत्सवप्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी दिली.
उत्सवाच्या आयोजनात ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अमिता अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ.तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, नीलेश लदद्ड आदींनी सहभाग घेतला आहे.
शनिवारी रात्री ९.३० वाजता होणाऱ्या रावण दहन कार्यक्रमात महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या या समस्यांसंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. तसेच प्रत्यक्ष महिला अत्याचाररुपी रावण दहनाचा कार्यक्रम पुणेकरांना पाहता येणार आहे.
याशिवाय उत्सवात इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी महिला सबलीकरण याविषयावरील आयोजित चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी ५.३० वाजता मंदिरात होईल.
त्यानंतर सायंकाळी ६ वाजता हळदी कुंकू आणि ओटीचा कार्यक्रम देखील होणार आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.





