नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्ध सुरू करून चितावणीखोर वक्तव्य केली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या धोरणात कसलीही संलग्नता नसल्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षित गुंतवणुकीचे ठिकाण या ब्रँडला तडा गेला आहे. यामुळे जागतिक गुंतवणूकदार आता अमेरिकेचे कर्जरोखे आणि डॉलरशिवाय सुरक्षित गुंतवणुकीसाठी इतर पर्याय शोधत आहेत. याचा परिणाम म्हणून सोने आणि चांदीची मागणी प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत भारतीय सराफात सोन्याचा दर एकाच दिवसात 6,250 रुपयांनी वाढून 96 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम या ऐतिहासिक विक्रमी पातळीवर गेला. जागतिक गुंतवणूकदाराबरोबरच भारतातील गुंतवणूकदार आणि दागिने उत्पादक सोन्याची खरेदी करीत आहेत. कारण आगामी काळात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता त्यांना वाटत आहे. कालपासून जागतिक आणि भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढल्यानंतर स्पॉट मार्केटमध्येही या दोन धातूचे दर वाढण्यासाठी पूरक वातावरण निर्माण झाले होते. अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू करण्यासाठी विविध देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक शेअर बाजार निर्देशांक कोसळू लागल्यानंतर या आयात शुल्काला स्थगिती दिली. त्याचबरोबर चीनवर मात्र सव्वाशे टक्क्यावर आयात शुल्क लावले होते. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या कर्जरोख्यांची विक्री वाढली आणि कर्जरोख्यावरील परतावा वेगाने कमी होऊ लागला. यामुळे अमेरिकेला कर्ज घेणे महागात पडणार आहे. या सर्वांचा परिणाम अमेरिकेच्या वित्तीय साधनाच्या विश्वासार्हतेवर झाला आहे. त्यामुळे सोन्यासारख्या पर्यायी वित्तीय साधनांची मागणी वाढत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. चांदीच्या दरातही वाढ – दरम्यान चांदीचा दरही शुक्रवारी 2,300 रुपयांनी वाढून 95,500 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला आहे. पंधरा दिवसापूर्वी चांदीचा दर एक लाख रुपयांवर गेला होता. मात्र नंतर जागतिक वातावरण निवळत असल्यामुळे या दरामध्ये घसरण झाली होती. आता पुन्हा जागतिक वातावरण खराब होत असल्यामुळे चांदीला गुंतवणूक म्हणून मागणी वाढली असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. जरी डोनाल्ड ट्रम्प त्यांनी विविध देशाविरुद्धचे आयात शुल्क कमी केले असले तरी चीनवरील आयात शुल्क कमी केलेले नाही. अशा परिस्थितीत जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थामध्ये व्यापार युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे जागतिक मंदीची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत महागाईपासून सामना करण्यासाठी लोक सोने आणि चांदीची खरेदी करीत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. देशातील आणि परदेशातील वायदे बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढून विक्रमी पातळीवर गेले आहेत. त्यामुळे लघु ते मध्यम पल्ल्यात या दोन धातूचे दर जास्त पातळीवर राहण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 3,222 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. गुंतवणूक करण्यासाठी एक योग्य देश म्हणून अमेरिकेची प्रतिमा गेल्या दोन वर्षापासून खराब होत असल्यामुळे जगभरातील रिझर्व बँकांनी डॉलर खरेदी ऐवजी सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन वर्षापासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. आता सोन्याचे दर आणखीच वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. मात्र यामुळे मध्यमवर्गीय आणि गरिबांना त्यांच्या भावनिक किंवा धार्मिक कारणासाठी सोने खरेदी करणे अवघड झाले आहे. डॉलर कोसळल्यामुळे रुपयाच्या मूल्यात 61 पैशाची वाढ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्धाच्या अनुषंगाने उलट -सुलट घोषणा केल्यामुळे अमेरिकेचा डॉलर वेगाने कमकुवत होत आहे. अशा परिस्थितीत इतर चलनांबरोबरच भारतीय रुपयाचे मूल्य वेगाने वाढत आहे. शुक्रवारी भारतीय रुपयाचा भाव तब्बल 61 पैशांनी वाढून 86 रुपये 07 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला. डॉलर कमकुवत होण्याबरोबरच भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आज जवळजवळ 2 टक्क्यांनी वाढल्यामुळेही रुपयाचे मूल्य वाढण्यास मदत झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील 26 टक्के आयात शुल्काला स्थगीती दिली आहे. त्यामुळेही भारतीय रुपयाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. सकाळी रुपयाचे मूल्य काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र नंतर डॉलर इंडेक्स 100 अंकाच्या खाली गेला. त्यानंतर रुपयाचा भाव वाढण्यास सुरुवात झाली. जगातील प्रमुख सहा चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स 1.52 टक्क्यांनी कोसळून 99.33 अंकावर आला. एक महिन्यापूर्वी हा डॉलर इंडेक्स 110 अंकाच्या पुढे होता. त्यामुळे डॉलर कमालीचा बळकट झाला होता. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी उलट -सुलट निर्णय घेऊन अमेरिकेचे प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे अमेरिकेतील वित्तीय साधने विश्वासार्ह राहिलेली नाहीत. पंधरा दिवसापासून आशिया आणि युरोपातील विविध देशाच्या चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य वेगाने कमी होत आहे. याला घाबरून डोनाल्ड ट्रम्प यांनी काल आयात शुल्क 90 दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यामुळे झालेली हानी भरून निघू शकली नाही. आता अमेरिकन संसद ट्रम्प यांच्या विरोधात काय निर्णय घेते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळत आहेत. अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होत आह. अमेरिकन डॉलर कमकुवत होत आहे. त्यामुळे अमेरिकेसमोर अनेक प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्माण केले आहेत. 000000 परकीय चलनसाठा वाढला 11 अब्ज डॉलरने – जागतिक पातळीवर अमेरिकेने सुरू केलेले व्यापार युद्ध सुरू असतानाच भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट असल्यामुळे आणि भारताने योग्य निर्णय योग्य वेळी घेतल्यामुळे भारतात येणार्या परकीय भांडवलावर फारसा परिणाम झालेला नाही. उलट भारताकडील परकीय गंगाजळीत गेल्या काही आठवड्यापासून वाढ होत आहे. 4 मार्च रोजी आठवड्यात भारताकडील परकीय चलन चाटात तब्बल 11 अब्ज डॉलरने वाढून 676.2 अब्ज डॉलर या पातळीवर गेला. या अगोदरच्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 6.5 अब्ज डॉलरने वाढला होता. गेल्या पाच आठवड्यापासून भारताकडील परकीय चलन साठ्यात एकतर्फी वाढ होत आहे. त्यामुळे भारताच्या रुपयाचे मूल्य स्थिर होण्यास मदत होत आहे. एवढेच नाही तर भारताचा रुपया गेल्या काही दिवसापासून बळकट झाला आहे. अमेरिकेने सप्टेंबर महिन्यामध्ये व्याजदर कपात केल्यानंतर भारतीय शेअर बाजार आणि उद्योग क्षेत्रात झालेली गुंतवणूक वाढून भारताकडील परकीय चलन साठा 704.8 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेला होता. त्यानंतर अमेरिकेत महागाई वाढल्यामुळे व्याजदर कपात होणार नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर भारतातील बरीच गुंतवणूक परत गेली होती. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या व्यापार युद्धामुळे या गुंतवणुकीवर परिणाम झाला होता. दरम्यान व्यापार युद्धामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य या आठवड्यामध्ये दीड अब्ज डॉलरने वाढून 79.36 अब्ज डॉलर या पातळीवर गेले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे भारताची 4.45 अब्ज डॉलरची ठेव आहे.