Gold Rate Today : आज सोने 1000ने उसळले, चांदी 4000च्या झेपेसह उच्चांकावर; का आली ही तेजी?

Gold Rate Today : बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली. सोने १,००० रुपयांनी वधारून १,०१,०२० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले, तर चांदीने ४,००० रुपयांची उसळी घेत १,१८,००० रुपये प्रति किलोचा नवा उच्चांक गाठला. ही तेजी केवळ देशांतर्गत कारणांमुळे नसून, जागतिक पातळीवरील अस्थिरताही याला कारणीभूत आहे.
सोने का महागले?
ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार, ९९.९% शुद्ध सोने १,००० रुपये वाढून १,०१,०२० रुपये प्रति १० ग्रॅम, तर ९९.५% शुद्ध सोने ९०० रुपये वाढून १,००,४५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, “अमेरिका आणि युरोपियन युनियनमधील व्यापारी कराराबाबत अनिश्चितता आणि अमेरिकी डॉलरमधील कमजोरी यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत.”
चांदीने गाठला उच्चांक –
चांदीतही मोठी वाढ दिसली. मंगळवारी ३,००० रुपये वाढून १,१४,००० रुपये प्रति किलोवर बंद झालेली चांदी बुधवारी आणखी ४,००० रुपये वाढून १,१८,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली. यामागे इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पॅनल्स आणि औद्योगिक उत्पादनांमुळे चांदीला असलेली मागणी कारणीभूत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजार आणि भविष्य –
एमसीएक्सवर चांदी १,१६,५५१ रुपये प्रति किलोवर, तर सोने १,००,३०५ रुपये प्रति १० ग्रॅमवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ३,४२२.८७ डॉलर प्रति औंस, तर चांदी ३९.३९ डॉलर प्रति औंसवर होती. एलकेपी सिक्युरिटीजचे जतिन त्रिवेदी म्हणाले, “अमेरिका, युके आणि युरोजोनच्या आर्थिक आकडेवारीवर बाजाराचे लक्ष आहे. सोने ९९,००० ते १,०१,५०० रुपये दरम्यान राहू शकते.”
गुंतवणूकदारांसाठी सल्ला –
जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सोने-चांदीकडे वळत आहेत. सध्याच्या उच्च दरांमुळे नवीन गुंतवणूकदारांनी थोडी सावधगिरी बाळगावी. मात्र, आधीच गुंतवणूक केलेल्यांसाठी नफा कमावण्याची ही संधी आहे.





