Gold Rate Today: सोनं-चांदी कोसळलं; 1350 आणि 5000 रुपयांची घसरण, कारण काय?

Gold Rate Today: गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना शुक्रवारी सराफा बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली. दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत १३५० रुपयांनी घसरून ९३,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर आली. गुरुवारी सोनं २०० रुपयांच्या वाढीसह ९४,३५० रुपये या विक्रमी उच्चांकावर पोहोचलं होतं. पण आता पाच दिवसांच्या तेजीनंतर ही पहिली मोठी घसरण आहे. त्याचबरोबर चांदीच्या किमतीतही ५,००० रुपयांची जबरदस्त घट झाली असून, ती ९५,५०० रुपये प्रति किलोग्रॅमवर खाली आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरी हे यामागचं प्रमुख कारण मानलं जात आहे.
जागतिक बाजारातही घसरण
जागतिक बाजारात सोनं आणि चांदीच्या किमतीतही पडझड झाली. स्पॉट गोल्ड २१.७४ डॉलर (०.७०%) घसरून ३,०९३.६० डॉलर प्रति औंसवर आलं, तर स्पॉट सिल्व्हर आशियाई बाजारात १.६९% नी खाली येऊन ३१.३२ डॉलर प्रति औंसवर स्थिरावलं.
चांदीत चार महिन्यांतील सर्वात मोठी घसरण
चांदीच्या किमतीत शुक्रवारी झालेली ५,००० रुपयांची घसरण गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी आहे. गुरुवारी चांदी १,००,५०० रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती, जी आता ९५,५०० रुपयांवर आली. मेहता इक्विटीजचे व्हीपी राहुल कलंत्री म्हणाले, “सोनं एका आठवड्याच्या नीचांकावर, तर चांदी पाच आठवड्यांच्या नीचांकावर पोहोचली. जागतिक इक्विटी बाजारात मोठी विक्री हेच यामागचं कारण आहे.”
किमती का घसरल्या?
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे सोन्याची सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी (सेफ हेवन डिमांड) कमी झाली आहे. अबान्स फायनान्शिअल सर्व्हिसेसचे सीईओ चिंतन मेहता म्हणाले, “निवेशकांचं लक्ष आता जागतिक व्यापार धोरण आणि आर्थिक मंदीच्या संभाव्य परिणामांवर आहे. यामुळे सोन्याच्या मागणीत घट झाली आणि किमतींवर दबाव वाढला.”





