नवी दिल्ली – अमेरिका- चीनदरम्यान व्यापार करारावर तोडगा निघण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच अमेरिका व्याजदर कपात करणार नसल्यामुळे डॉलर वधारत आहे. या कारणामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे आकर्षणमूल्य कमी झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर 300 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 25 हजार 300 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. सोन्याचे दर आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याची भावना गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाल्यामुळे गेल्या आठवड्यातही सोन्याच्या दरात बरीच घट झाली होती. मात्र चांदीमधील तेजी अजूनही संपुष्टात आलेली नाही. गुंतवणूक म्हणून चांदीची मागणी कायम असण्याबरोबरच विविध उद्योगाकडून चांदीची मागणी वाढत आहे आणि वाढत राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सराफात चांदीचा दर 1 हजार रुपयांनी वाढून 1 लाख 54 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला आहे. विश्लेषकांनी सांगितले की, डॉलर वधारत असल्यामुळे अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. अशा परिस्थितीत बरीच जागतिक गुंतवणूक सोन्याकडून अमेरिकेच्या कर्जरोख्याकडे वळत असल्यामुळे सोन्याच्या दरावर गेल्या आठवड्यापासून परिणाम होत आहे. चीनने गेल्या वर्षी सोन्याच्या खरेदीवरील मूल्यवर्धित कर रद्द केला होता. तो कर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला आहे. त्यामुळे चीनमधील किरकोळ ग्राहकांना सोने महागत पडणार आहे. अशा परिस्थितीत चीनच्या स्थानिक बाजारपेठेत सोन्याची मागणी कमी होऊ शकते. चीन हा जगातील सर्वात मोठा सोने आयातदार देश आहे. चीनकडून सोन्याची मागणी कमी होण्याच्या शक्यतेमुळे सोन्याचे दर कमी होत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान जागतिक बाजारात सोन्याचा दर बर्याच महिन्यानंतर 4 हजार डॉलरच्या खाली आला आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 0.14 टक्क्यांनी घसरून 3,996 डॉलर प्रति औंस या पातळीपर्यंत गेला आहे. याचा परिणाम जागतिक बाजारावर झाला. जागतिक बाजारात चांदीचा दरही बराच कमी होऊन आता 48 डॉलर प्रति औंसावर आला आहे.