दिल्ली सराफात सोन्याचा दर 1,000 रुपये वाढून 1,31,800 पार; चांदी 3,000 रुपये घसरली

नवी दिल्ली – जागतिक बाजारातील संकेतानुसार दिल्ली सराफात बुधवारी सोन्याचा दर 1 हजार रुपयांनी वाढून 1 लाख 31 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला.
चांदीचा दर अगोदरच उच्च पातळीवर असल्यामुळे काहीशी नफेखोरी होऊन चांदीचा दर बुधवारी 3 हजार रुपयांनी कमी होऊन 1 लाख 82 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. भारतात आणि परदेशात सोने आणि चांदीला मागणी कायम आहे. मात्र दरम्यानच्या काळामध्ये रुपयाचा भाव वाढल्यामुळे सोन्याची आणि चांदीची आयात वाढण्यास मदत होणार आहे.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 4,218 डॉलर प्रति औंस या ऐतिहासिक विक्रमी पातळीवर गेला आहे. विविध देशातील रिझर्व बँका सोन्याची खरेदी करीत आहेत. त्यातल्या त्यात चीन सोने आणि चांदीची जास्त प्रमाणात खरेदी करीत असल्यामुळे सोने आणि चांदीचे दर वाढत असल्याचे काही विश्लेषकांनी सांगितले.
जागतिक बाजारात चांदीचा दरही 2.81 टक्क्यांनी वाढून 52.84 डॉलर प्रति औंस झाला. भारतात सणासुदीच्या काळामध्ये सोन्याचे आणि चांदीचे जर जास्त असल्यामुळे मध्यमवर्गीयाची मात्र कुचंबना होत आहे. अशा परिस्थितीत हे ग्राहक कमी कॅरेटच्या सोन्याची खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे.



