Gold Rates : ‘या’ कारणांमुळे सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण; 10 ग्रॅमचा भाव पाहा
Gold Rates : सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी 1,500 रुपयांची घसरण झाली. दिल्लीतील 99.9% शुद्ध सोन्याचा भाव 1,60,900 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

Gold Rates : सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी घसरण झाली आहे. सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात 10 ग्रॅम 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 1,500 रुपयांनी कमी होऊन 1,60,900 रुपये झाला. शुक्रवारी सोन्याचा भाव 1,62,400 रुपये होता.
गेल्या काही आठवड्यांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे आता काही गुंतवणूकदार नफा कमावण्यासाठी सोन्याची विक्री करत आहेत. यामुळे सोन्याच्या दरावर दबाव आला आहे.
दरम्यान, चांदीचा भाव 2,45,500 रुपये प्रति किलो इतका स्थिर राहिला.
अमेरिकेतील व्याजदराचा सोन्यावर परिणाम –
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांनी महागाई अजूनही नियंत्रणात आलेली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता वाढली आहे.
अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने डॉलर मजबूत झाला आणि अमेरिकेतील सरकारी रोख्यांवरील परतावा वाढला आहे. याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे.
जागतिक बाजारात सोन्याचा भाव 4,448.56 डॉलर प्रति औंस झाला आहे. दुसरीकडे चांदीचा भाव जवळपास 1 टक्क्यांनी वाढून 66.97 डॉलर प्रति औंस झाला आहे.
अमेरिका-इराण संघर्षाचाही परिणाम –
अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा लष्करी हल्ले झाल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तेल महाग झाल्यास महागाई वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवू शकते, अशी भीती बाजारात आहे.
या सर्व कारणांमुळे सध्या सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. शुक्रवारीही जागतिक बाजारात सोन्याचा भाव सुमारे 4,455 डॉलर प्रति औंसवर आला होता.
दरम्यान, मेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता, मजबूत डॉलर, वाढलेले रोखे उत्पन्न आणि सोन्यातील नफा वसुली यामुळे सोन्याच्या दरावर दबाव आला आहे.





