Gold IN World: अमेरिकेत सर्वाधिक साठा, भारतही मागे नाही; जाणून घ्या TOP 10 देशांत कोणाकडे किती टन सोने

नवी दिर्ल्ली – वीस वर्षापासून जागतिक आर्थिक अस्थिरता वाढत आहे. महागाई, चलनांचे अस्थिर मूल्य आणि वित्तीय संकटांचा सामना करण्यासाठी विविध देशांच्या रिझर्व बँका सोन्याची खरेदी वाढवीत आहेत. प्राप्त माहितीनुसार जगातील बड्या दहा देशांकडे सोन्याचा जास्त साठा एकवटलेला आहे. अमेरिकेकडे सर्वात जास्त सोने असून युरोपातील बर्याच देशातील सोन्याचा साठाही वाढत चालला आहे.
अमेरिकेकडे पूर्वीपासूनच सोन्याचा साठा जास्त आहे. यामुळे अमेरिका जागतिक चलन असलेल्या डॉलरला आधार देऊ शकते. डॉलरचा जागतिक प्रभाव कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकते. 2008 मध्ये जागतिक आर्थिक पेेच प्रसंग निर्माण झाला होता. त्यानंतर भारतासह जगातील विविध रिझर्व बँका सावध झाल्या असून स्थानिक चलनाला आधार देण्यासाठी सोन्याचा साठा वाढविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांच्या ध्यानात आले आहे.
असे असतानाच हे सोने परदेशात न ठेवता जास्तीत जास्त प्रमाणात मायदेशी ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे इंग्लंड आणि स्वित्झर्लंडमध्ये ठेवलेले आपले सोने बर्याच देशांनी गेल्या काही वर्षात परत मायदेशी आणले आहे.
अमेरिकेने सुरू केलेले व्यापार युद्ध आणि विविध देशांदरम्यानचे युद्ध या कारणामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत स्वतःचे सोने स्वतः जवळच असावे अशी भावना विविध देशांदरम्यान निर्माण झाली आहे. करोनानंतर जगभरात महागाई वाढत आहे. त्यामुळे आता जागतिक गुंतवणूकदार इतर वित्तीय साधनांबरोबरच सोने आणि चांदीची जास्त खरेदी करू लागले आहेत. अशा परिस्थितीत जानेवारीपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सोन्याची घसरण सुरुच –
अमेरिकेच्या रिझर्व बँकेसह विविध देशाच्या रिझर्व बँकांनी आगामी काळात महागाईमुळे व्याजदर कपात करता येणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे सोने आणि चांदीची पीछेहाट चालू आहे. दिल्ली सराफात सोन्याचा दर 1,200 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 24 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 2,500 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 51 हजार 500 रुपये प्रत्येक किलो या पातळीवर गेला. चीनकडून मागणी कमी होत असल्यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम होत असल्याचे बोलले जाते.
कोणाकडे किती सोने –
अमेरिका 8,133 टन
जर्मनी 3,350 टन
इटली 2,452 टन
फ्रान्स 2,437
रशिया 2,333 टन
चीन 2,279 टन
स्वित्झर्लंड 1,040 टन
भारत 880 टन
जपान 846 टन
नेदरलँड 623 टन



