विठुरायाला सोन्याचं दान; भाविकांनी अर्पण केले दागिने

पंढरपूर: गरीब शेतकऱ्यांचा आधार असलेला पंढरीचा पांडुरंग आपल्या भक्तांच्या प्रेमापुढे नेहमीच नम्र होतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक आपल्या लाडक्या विठुरायाला रोख रक्कम आणि मौल्यवान दागिन्यांचं दान अर्पण करतात. यापूर्वीही अनेकदा सोन्या-चांदीच्या वस्तू आणि दागिने मंदिराला दान मिळाले आहे.
भाविकांचं प्रेम: 6.5 लाखांचे दागिने देणगी –
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला आज भाविकांकडून 6 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 2 लाखांची रोख देणगी मिळाली. ठाण्याचे भाविक दलाल कुटुंबियांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ 73.950 ग्रॅम वजनाचा सोन्याचा चार पदरी हार, पदक आणि ठुशी अर्पण केली, ज्याची किंमत 5 लाख 82 हजार रुपये आहे. तर, छत्रपती संभाजीनगरचे विठ्ठल भक्त संकेत पंडित यांनी 9.800 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन दान दिली, जिची किंमत 77 हजार रुपये आहे. याशिवाय, चेन्नईचे भक्त पी. एस. कुमारगुरूतम यांनी 2 लाख रुपयांची रोख देणगी विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली. मंदिर समितीने या सर्व भक्तांचा सत्कार केला.
पांडुरंगाची भक्ती: सातत्याने दानाचा ओघ-
पंढरीचा पांडुरंग हा भक्तांच्या प्रेमाला भुकेला आहे, असं म्हणतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल होतात. या भक्तीच्या ओघातच भाविक आपल्या श्रद्धेप्रमाणे देवस्थानचा विकास, सुशोभीकरणासाठी सोनं, चांदी आणि रोख रक्कम अर्पण करतात.





