गणरायाच्या सजावटीसाठी सोन्या-चांदीचे साहित्य

पुणे – गणेशोत्सव म्हटला की, गणेशमूर्ती आणि सजावटीची लगबग जशी असते तशी सराफी बाजारातही तेजी असते. गणेशाला सालंकृत करून त्याची प्रतिष्ठापना करण्याची पद्धती गेल्या काही वर्षांपासून दृढ होऊ पाहत आहे. ही मानसिकता ओळखूनच सराफी पेढ्यांमध्ये गणेशमूर्तीला सजवण्यासाठी सोन्या-चांदीचे दागिने, सजावटीसाठी अनेकविध प्रकारच्या वस्तू “डिस्प्ले’ केल्या जात आहेत.
गणेशमूर्तीला रंगांच्या सहाय्याने सजवण्याचा प्रकार होता. त्याच्या वस्त्रांना विविध रंग, मुकुट, आयुध, अलंकार यांचा सोनेरी रंग या माध्यमातून ती सजवली जात असे. त्यानंतर मुकुट रंगीबेरंगी खड्यांनी सजवण्याचा प्रकार सुरू झाला. शेला, धोतर असे विविध प्रकारही कापडी वस्त्रांमध्ये आले. आता याची जागा सोन्या-चांदीच्या वस्तूंनी घेतली आहे.
सध्या बाजारात शेले, अन्य वस्त्र प्रावरणे ही चांदीवर सोन्याचे पाणी देऊन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय गणेशाच्या डोईवरचे छत्र, चौरंग, समई, दिवे, मुकुट, हातातील आयुध, पीतांबर, हातातील आणि पायातील तोडे, शुंडाभूषण, जानवे, उंदीर, मोदक, केळीचे घड, पान सुपारी, नैवेद्य ठेवण्यासाठी केळीच्या पानाच्या आकाराचे ताट, तांब्या भांडे, पंचपळीपात्र, पंचारती, प्रसादासाठी पातेले, छोटे ताट, वाट्या, सोनचाफा, जास्वंद, दुर्वा, मोगरा, मोदक यांचे हार, याशिवाय अन्य विविध प्रकारचे “डिझायनर’ हार, पंचखाद्य असे एक ना अनेक प्रकार चांदी-सोन्यामध्ये तयार होऊन सराफी बाजारात दाखल झाले आहेत.
चांदीची कायमस्वरूपी मूर्ती घेऊन तिची दहा दिवस यथासांग पूजा करून तिचे विसर्जन करून, तीच मूर्ती कायमस्वरूपी वापरण्याला अनेकांनी सुरूवात केली आहे. त्या पूजेसाठीही आकाराने मोठ्या परंतु कमी वजनाच्या मूर्ती सराफांकडे उपलब्ध झाल्या आहेत. डिझायनर आसनावर विराजमान झालेल्या मूर्ती अनेकविध प्रकारात पाहायला मिळत आहेत. यामध्ये शहरातील काही प्रसिद्ध गणेशाच्या प्रतिकृती आहेत. यातील “अँटीक’ प्रकार खास आकर्षक आहेत.
सर्व आकारांत दागिने…
अगदी छोट्या मूर्तींपासून ते मोठ्या मूर्तींपर्यंत आवश्यक असतील त्या आकारातील दागिने सराफांकडे उपलब्ध झाले आहेत. यातील बहुसंख्य प्रकार हे चांदीमध्ये आहेत. परंतु “मेड टू ऑर्डर’प्रमाणे हवे असेल तर या दागिन्यांना सोन्याचे पॉलिशही करून दिले जाते, अशी माहिती “नीळकंठ ज्वेलर्स’ आणि “पु. ना. गाडगीळ’ या सराफांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी दिली.





