कोल्हापूर : गेली 25 वर्ष ‘गोकुळ’वर माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता होती. मात्र चार वर्षांपूर्वी आमदार सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी एकत्र येत गोकुळ मधील महाडिकांच्या विरोधात असलेल्या नेत्यांना आपल्या सोबत घेऊन सत्ता उलटवून लावली. यानंतर गोकुळचे अध्यक्ष पद दोन – दोन – एक असे वर्ष वाटून घेण्याचे ठरले होते. त्यानुसार सुरुवातीला सतेज पाटील यांच्या गटातील विश्वास पाटील यांनी सुरुवातीचे दोन वर्ष अध्यक्ष पद भूषवलं यानंतर दोन वर्ष हसन मुश्रीफ गटाचे अरुण डोंगळे अध्यक्ष पद भूषवत आहेत. त्याचा कार्यकाल आज संपला असून त्यांना पाटील व मुश्रीफ यांनी राजीनामा देण्यास दोन्ही नेत्यांनी सांगितले होते. मात्र अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राजीनामा मागणारे दोन्ही नेते अडचणीत सापडले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये बदललेल्या राजकिय परिस्थितीचे पडसाद सहकार क्षेत्रावर देखील पडू लागले आहेत. त्यामुळे सगळीच समिकरणे बदलत आहेत. राज्यात महायुतीमध्ये असलेले नेते गोकुळमध्ये देखील आता एकत्र येऊ लागले आहेत. सध्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे महायुतीच्या जवळ असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा असावा, असे राज्य पातळीवरील नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर देखील अरुण डोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी राजीनामा देऊ नये, अशा सूचना दिल्या असून महायुतीचा अध्यक्ष असायला हवा, असे म्हणत मी राजीनामा देणार नाही, असे अरुण डोंगळे यांनी स्पष्ट केले. गोकुळमध्ये घडणाऱ्या घडामोडी सकारात्मक आहेत. ‘गोकुळ’वर यापूर्वी ज्यांची सत्ता होती, त्यांनी गोकुळ चांगल्या पद्धतीने सुरू ठेवले होते. मात्र आघाडी सरकार आल्यानंतर माजी पालकमंत्र्यांनी शक्कल लढवत, माजी मुख्यमंत्र्यांची मदत घेत महाविकास आघाडीचे पॅनल बनवले आणि आमच्या विरोधात पॅनल उभा केले. त्यामुळे या निवडणुकीला राजकीय स्वरूप आले. ते एकत्र आले आणि गोकुळ ताब्यात घेतले. मात्र महायुतीचा सरकार आहे. त्यामुळे महायुतीचाच अध्यक्ष गोकुळ मध्ये व्हावा अशी माझी इच्छा असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे.