Pankaja Munde – राज्यात विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढला असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीतील आपल्या पराभवावर पुन्हा एकदा खंत व्यक्त केली आहे. ‘मी खासदार व्हायला गेले आणि आमदार झाले. मला तुमचीच नजर लागली, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडे यांची परळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य बोलून दाखवले. त्या म्हणाल्या, मला कदाचित तुमचीच नजर लागली मी दिल्लीला गेल्यानंतर इथे लक्ष देणार नाही असे तुम्हाला वाटत होते. त्यामुळेच असे झाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मी येथील अर्ध्याहून अधिक लोकांच्या पाया पडले. काय रे वेंकटेश, काय दत्ताभाऊ, खरे आहे की नाही? 5-6 हजार मतांनी झालेला पराभव हा पराभव नसतो. मला तुमचीच नजर लागली असे वाटत आहे. मी दिल्लीला जाईन, दिल्लीला जाईन, असे सतत घोकत होते. ताई दिल्लीला गेल्यावर मग आम्ही काय करणार, त्या इथे लक्ष देणार नाहीत, असे सगळे यांचे चालले होते. घ्या मग आता. आले मी परत तिथेच’. असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आता भूमिका बदलली आहे ! माझी व धनंजय मुंडे यांची भूमिका आता बदलली आहे. पूर्वी मी विधानसभेत होते आणि ते विधान परिषदेत होते. आता मी विधान परिषदेत आहे आणि ते विधानसभेत आहेत. ते आता पुन्हा विधानसभेवर निवडून जातील. तुम्हा मतदारांना एकाच बटनात दोन आमदार मिळाले आहेत. तुम्हाला अजून काय पाहिजे?, असेही त्या यावेळी म्हणाल्या.