पुणे जिल्हा | पैशांपुढे देवांच्या शपथा कमी पडल्या – आमदार मोहिते

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – माझ्या पॅनलमध्ये निवडणूक लढवून तिघांनी दगा दिला. पैशांपुढे देवांच्या शपथा कमी पडल्या. यांच्यासह ज्यांनी-ज्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधात राजकारण केले.
त्यांच्याकडून व्याजा सकट वसुल करू भविष्यात बाजार समितीवर आपल्या विचारांचा सभापती, उपसभापती करण्याची हिम्मत फक्त दिलीप मोहितेमध्ये आहे.
या निवडणुकीचा विधानसभेवर काडीचाही परीणाम होणार नाही, विरोधकांनी हुरळून जाऊ नये, असा दणदणीत इशारा आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तालुक्यातील सर्व पक्षीय विरोधकांना दिला.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी तालुक्यात जनसंवाद दौरा आयोजित करण्यात आला आहे. यादरम्यान आमदार मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून गावोगावी होत असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन होत आहे.
सांडभोरवाडी (तिन्हेवाडी) येथे तालुका क्रीडा संकुल ते ढोरे वस्ती पर्यंत होणार्या 70 लाख रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन आमदार मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरूण चांभारे, मंगल चांभारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमटकर, विलास कातोरे, संध्या जाधव, अॅड. मनीषा टाकळकर, सुभाष होले, प्रदीप सांडभोर, उद्योजक स्वप्नील ढोरे, जयराम पाचारणे, राजेंद्र पाचारणे,
सांडभोरवाडीच्या सरपंच प्रतीक्षा पाचारणे, उपसरपंच रंगनाथ आरुडे, माजी उपसरपंच बाळासाहेब सांडभोर, ग्रामपंचायत सदस्य भगवान पाचारणे, ज्ञानेश्वर आरूडे, प्रियांका पाचारणे, सीमा पठारे, कविता आरुडे, कविता सांडभोर, सोसायटी अध्यक्ष मधुकर सांडभोर व ग्रामस्थ यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
डाव पलटवणारा मोहिते एकमेवच आहे
विरोधकांना माझ्या विरोधात बोलून आणि वागुन मोठे व्हायचे आहे. त्यांच्याकडे सार्वजानिक उपयोगाचे द्यायला काहीच नाही. मी विकासावर विश्वास ठेऊन जनतेला सामोरा जात आहे.
जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. विरोधकांनी बाजार समिती संचालक पळवुन नेऊन कुरघोडी केली; मात्र हाच डाव पलटवणारा मोहिते एकमेव आहे.
एका गोष्टीने हुरळून गेलेल्या विरोधकांना सामजिक बांधिलकी, भान नाही. तसे असते तर माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांच्या याच चेल्यानी त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचे फ्लेक्स झाकुन स्वतःचे फोटो झळकवले नसते, अशी टीका मोहिते पाटील यांनी केली.





