Newasa : गोधेगावात नरभक्षक बिबट्या जेरबंद; ग्रामस्थांना दिलासा
Newasa : नेवासे तालुक्यातील भालगाव-गोधेगाव परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. हल्ल्यांत एकाचा मृत्यू, दोघे जखमी झाले होते.

Newasa : भालगाव-गोधेगाव परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला. गुरुवारी (दि. ५) सायंकाळी सहाच्या सुमारास विजय शिंदे यांच्या वस्तीशेजारी लावलेल्या पिंजऱ्यात तो जेरबंद झाला. या बिबट्याच्या हल्ल्यांत एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. बिबट्या पकडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
घरात घुसून महिलेवर हल्ला
गुरुवारी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने पल्हारे वस्तीवरील घरात झोपलेल्या कुसुम हिरामण पल्हारे (वय ६१) यांच्यावर हल्ला केला. रात्रीपासूनच तो वस्तीजवळ फिरत होता. ग्रामस्थांसमोर त्याने एका कुत्र्याची शिकार केली. त्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्यावर घरात घुसून महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या कंबर, डोके आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.
यापूर्वी २७ ऑक्टोबर रोजी १२ वर्षीय शिवराज शिंदे याच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्याआधी शेतमजूर सुरेश अहिरे (भोऱ्या बाबा) यांना उसाच्या शेतात ओढून नेत त्याने ठार केले होते. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतात जाणेही धोकादायक बनल्याने ऊसतोड आणि कापूस वेचणीची कामे ठप्प झाली होती.
वनविभागाच्या कारवाईचे ग्रामस्थांकडून स्वागत
बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांना रात्री घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनविभागाने परिसरात पिंजरे लावले आणि गस्त वाढवली. अखेर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या कारवाईबद्दल गोधेगाव ग्रामस्थांनी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
दरम्यान, आमदार विठ्ठलराव लंघे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर वनविभागाने लागोपाठ दोन बिबटे जेरबंद केल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असला, तरी परिसरात आणखी बिबटे असण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.





