देव तारी त्याला कोण मारी ! हृदय बंद असूनही वाचविले तरुणाचे प्राण

नवी मुंबई – तळोजा येथील ३२ वर्षीय तरूण अनिकेत नलावडे यांचे ह्रदय बंद पडले होते. मात्र, सुदैवाने रुग्णालयात त्यांचा जीव वाचला आहे. विशेष म्हणजे गाडी चालवताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने अपघात झाला, या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला, तर एक जण जखमी झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिकेत नलावडे यांच्या छातीत दुखायला लागल्यानंतर ते पत्नीला घेऊन कारने हॉस्पीटलमध्ये जात होते. पण, कळंबोली जवळ पोहोचताच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी झालेल्या अपघातात त्यांनी बाईकस्वाराला उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे.
कारमध्ये अडकलेल्या अनिकेत नलावडे यांना व्हाईट लोटस रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासले असता त्यांचे हृदय आणि बीपी पूर्णपणे बंद झाले होते.
जवळपास मृत्युच्या दाढेत अनिकेत नलावडे पोहोचले होते. मात्र, हृदयरोगतज्ञ डॉ. विजय डीसूजा यांनी त्वरीत उपचार करत पुढील एक तासात अनिकेत नलावडे यांना शुध्दीवर आणून त्यांचे प्राण वाचविले.





