दैव बलवत्तर! मालवाहतुक बस 500 फूट दरीत कोसळूनही दोघे बचावले

पाचगणी (प्रतिनिधी) – कोकणातील सावंतवाडी येथील एसटी आगाराची मालवाहतूक करणारी बस (एमएच-20-बीएल-0429) केळघर घाटातील काळा कडा येथे 500 फूट दरीत बुधवारी (दि. 10) रात्री कोसळून देवरुख आगाराचे चालक मयूर पावनीकर (वय 40) व रामकिशन केंडे (वय 42) हे जखमी झाले आहेत. या अपघातातून सुदैवाने दोन्ही चालक बचावले.
मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि अमोल माने, महाबळेश्वर एसटी आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे, स्थानकप्रमुख किरण धुमाळ, मेढा आगार व्यवस्थापक सुजित घोरपडे, महाबळेश्वर आगाराच्या कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मुकवली माची येथील प्रकाश खुटेकर, विठ्ठल खुटेकर, सर्जेराव खुटेकर, बाळू खुटेकर, सुनील खुटेकर, रेंगडी येथील भरत कासुर्डे यांनी जखमींना दरीतून वर काढले.
केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथे खासगी रुग्णालयात वेळेवर नेता आले. याबाबत मेढा पोलीस ठाण्यातून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी आगाराची मालवाहतुकीची बस कलिंगडे भरून बुधवारी रात्री माणगावहून सांगलीकडे निघाली होती.
ही बस रात्री दहाच्या सुमारास केळघर घाटात रेंगडी गावच्या हद्दीत काळा कडा येथे एका अवघड वळणावर आली. त्यावेळी चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने व नियंत्रण सुटल्याने बस 500 फूट खोल दरीत कोसळली. या बसमधील एका चालकाने दरीतून वर येऊन मार्गावरील इतर वाहने थांबून अपघाताची कल्पना दिली.
स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत केल्याने या चालकांचे प्राण वाचले. विभाग नियंत्रक सागर पळसुले, विभाग यंत्र अभियंता मोहिते यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. या अपघाताची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली असून सपोनि अमोल माने तपास करत आहेत.
वन विभागाने लक्ष द्यावे
काळा कडा येथील अवघड वळणाचा अंदाज नव्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे तेथे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. घाटातील हा भाग वन विभागाच्या हद्दीत येतो. अनेक अपघात घडूनही वन विभागाने या वळणावर संरक्षक कठडे उभारलेले नाहीत. अजून किती अपघात झाल्यानंतर वन विभागाला जाग येईल, असा सवाल उपस्थित होत आहे.





