Satara | पसरणीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

वाई, (प्रतिनिधी) – पसरणी, ता. वाई येथील ज्ञानेश्वर नारायण येवले यांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. रात्री १०. ३० च्या सुमारास नवाब बंगल्याच्या पाठीमागे काही तरुणांनी झाडीत लपलेला बिबट्या पहिला असून बिबट्याच्या वावरामुळे पसरणी गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे
वनविभागाने बिबट्याचा लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गेल्या तीन दिवसापासून पसरणी परिसरात बिबट्या असल्याची कुजबुज सुरु होती. मात्र, काल दि. २५ रोजी रात्री १०. ३० च्या सुमारास काही तरुण नवाब बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या शेडकडे निघाले होते.
त्यावेळी सोबतची कुत्री भुंकू लागल्याने झाडीमध्ये बिबट्या असल्याचे त्यांनी पाहिले. त्याची चित्रफीत बनवून त्यांनी गावातील तरुणांना सावध केले. बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. परंतु तो न घाबरता तसाच बसून होता.
तरुण तेथून निघून गेल्यानंतर रात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर येवले यांच्या गोठ्यातील शेळीवर बिबट्याने हल्ला करत तिला ठार केले.
मात्र, गळ्यात बांधलेल्या दोरीमुळे बिबट्याला शेळी ओढून नेता आली नाही. सकाळी येवले गोठ्यावर गेल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळला भेट देऊन शेळीचा पंचनामा केला. तसेच बिबट्याचा माग काढण्याच्या प्रयत्न केला.





