पणजी : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांपूर्वीच उत्तराखंडमध्ये बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला होता. आता केजरीवाल यांनी गोव्यातील सरकारवर हल्लाबोल केलाय. येथे लाच दिल्याशिवाय सरकारी नोकरी मिळत नसल्याचा दावा करताना त्यांनी गोव्यात मोठी घोषणा केली.
केजरीवाल यांनी म्हटलं की, आम आदमी पक्षाचं गोव्यात सरकार बनताच प्रत्येक घरातून एका युवकाला नोकरी देण्यात येईल. गोव्यातील तरुणांसाठी सरकारी नोकरीत 80 टक्के कोटा आरक्षित करण्यात येईल. तसेच युवकांना नोकरी मिळत नाही, तोपर्यंत दरमहा तीन हजार रुपये देण्यात येईल, असंही केजरीवाल यांनी आश्वासन दिलं.
नोकरी आणि तरुणांव्यतिरिक्त केजरीवाल यांनी पर्यटन आणि खननशी संबंधित कुटुंबांना बेरोजगारी भत्ता देण्यासंदर्भात वचन दिलं आहे. ते म्हणाले की, गोव्यात अनेक कुटुंब पर्यटनातून उदरनिर्वाह करतात. करोनामुळे त्यांचा रोजगार बंद झालाय. अशा कुटुंबांना आपला व्यावसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आम आदमी पक्ष प्रत्येकी पाच हजार रुपये दर महिन्याला देईल. हीच मदत मायनिंग पुन्हा सुरू होईपर्यंत मायनिंगचं काम करणाऱ्या कुटुंबाला देऊ, असंही केजरीवाल यांनी नमूद केलं.
या व्यतिरिक्त दिल्लीच्या धर्तीवर गोव्यात तरुणांसाठी स्कील युनिव्हर्सिटी उभारण्यात येईल. जेणेकरून कौशल्य विकास होईल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.