SCO Summit : दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशांना उघडे पाडावे – एस. जयशंकर

Shanghai Cooperation Organisation Summit : – दहशतवादाची जोपासना करणारे, दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थान देणारे आणि दहशतवाद्यांना माफ करणाऱ्या देशांना स्वतंत्रपणे ओळखून उघडे पाडावे, असे आवाहन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेमध्ये ते बोलत होते. दहशतवाद्यांना सोडून दिल्यामुळे दहशतवाद हा प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी एक धोका बनत चालला आहे, अशा शब्दात जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानवर टीका कली.
कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन जयशंकर यांनी सादर केले. शांघाय सहकार्य संघटनेच्या मूळ उद्देशांपैकी एक उद्देश दहशतवादाचा मुकाबला करणे हा असल्याचेही जयशंकर यांनी सांगितले.
आपल्यापैकी अनेकांना सीमेपलिकडील दहशतवादाचा अनुभव आहे. जर या दहशतवादाचा सामना केला नाही तर प्रादेशिक आणि जागतिक शांततेला धोका निर्माण होईल.कोणत्याही स्वरुपातील दहशतवादाचे समर्थन केले जाता कामा नये. असेही जयशंकर म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य चीन आणि पाकिस्तानला उद्देशून होते. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला आंतरराष्ट्रीय मंचावर सांभाळण्याची जबाबदारी आतापर्यंत नेहमी चीनने घेतली आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांना काळ्या यादीत टाकण्यासाठी संयुक्त राष्ट्रातल्या प्रत्येक प्रस्तावाला चीनने आडकाठी घातली होती.
सीमेपलिकडील दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले जायला पाहिजे. दहशतवादाचे अर्थसहाय्य आणि भरतीला ठामपणे विरोध केला जायला पाहिजे. युवकांमध्ये कट्टरतावाद पसरवला जाण्यालाही उत्स्फूर्तपणे प्रतिकार केला जायला पाहिजे, असे सांगून गेल्या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२० परिषदेतील संयुक्त निवेदनात हीच कटिबद्धता अधोरेखित केली गेली होती, याची आठवणही जयशंकर यांनी करून दिली.
लोकांना एकत्र करणे, सहकार्य, एकत्रित विकास करणे आणि समृद्ध करणे आणि शतकांपूर्वीच्या वसुधैव कुटुंबकम या तत्वाचा अंगिकार करण्यासाठी शांघाय सहकार्य संघटना हे उचित व्यासपीठ आहे, असेही जयशंकर म्हणाले.
चीन, रशियाच्याप्रभावाखालील देशांची परिषद…
या परिषदेला भारत, इराण, कझाकिस्तान, चीन, किर्गिझ, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या सदस्य देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते. दहावा सदस्य देश म्हणू बेलारुस या संघटनेमध्ये सहभागी होणार आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्यासह अन्य सदस्य देशांचे प्रमुख नेतेही उपस्थित होते.





